
नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि पदुकोण शटलर्स अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 26 ते 29 मार्च 2026 दरम्यान होणाऱया योनेक्स सनराईज मनोज रामचंद्रन स्मृती राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत 2.68 लाख रुपयांची एकूण बक्षिसे ठेवण्यात आली असून या स्पर्धेत राज्यातील अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत.
बृहन्मुंबई बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होणाऱया स्पर्धेतील सामने नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळवले जातील. पुरुष आणि महिला एकेरी तसेच 15 आणि 11 वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी गटांसाठी स्पर्धा असून पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना प्रत्येकी रोख 41,000 रुपये तर उपविजेत्याला प्रत्येकी रोख 31,000 रुपये बक्षीस मिळेल. तिसऱया आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
15 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्याला 8,500 रुपये, उपविजेत्याला 5,500 रुपये आणि तिसऱया क्रमांकाच्या विजेत्याला 3,500 रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
बॅडमिंटन स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी 1000 रुपये प्रवेश शुल्क आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जितेश पदुकोण यांच्याशी (98210 51790) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




























































