
इराण युद्धामुळे नैसर्गिक वायू पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे देशात मोठय़ा प्रमाणात गॅसटंचाई दिसून येत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये नागरिक एलपीजी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगेत रोज उभे राहात आहेत. अशा परिस्थितीत नवी दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) एलपीजी एटीएमची सुरुवात केली आहे.
राजधानीच्या क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग आहे. कंपनीचा हा एक पथदर्शी प्रकल्प असून लवकरच देशातील अनेक शहरात असे एलपीजी एटीएम सुरू करण्याची योजना आहे. गुरुग्राममधील सोहाना येथील सेक्टर -33 मध्ये एका रहिवासी भागात एलपीजी एटीएमची सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी ग्राहकांना रिकामे सिलिंडर एलपीजीने भरून घेता येईल. कम्पोझिट सिलिंडर भरण्यासाठी जास्तीत जास्त तीन मिनिटांचा कालावधी लागेल. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच सिलिंडर रिफील करून घेता येईल.
यूपीआय किंवा क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे पेमेंट करता येईल. नियमित लोखंडी सिलिंडरऐवजी फायबरवर आधारित बनविलेले 15 किलोचे सिलिंडर येथे रिफिल करून मिळेल. पारंपरिक धातूच्या सिलिंडरचे वजन 14 किलोग्रॅम गॅससह 31 किलोग्रॅम असते. त्यातुलनेत कंपोझिट सिलिंडरचे वजन तेवढय़ाच गॅससह 15 किलोग्रॅम भरते.

























































