
दिल्लीत एक अजब प्रकरण घडले. ऑनर किलिंगच्या भीतीने एक तरुण जोडपे घरातून पळून गेले. सोशल मीडियावरील रिल्स बघून त्यांना वाटले की, सुप्रीम कोर्टात गेले की लग्न होते. म्हणून ते थेट सुप्रीम कोर्टाच्या परिसरात पोचले.
वकील हरविंदर चौधरी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, पार्किंग एरियात आम्ही घाबरलेल्या मुलामुलीला बघितले. मुलगी 19 वर्षांची तर मुलगा 22 वर्षांचा. ते दोघे संरक्षण मागायला आले होते. त्यांना भीती वाटतेय की, त्यांचे आईवडील त्यांना बंदुकीने मारतील. मुलीच्या घरून जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दोघे उत्तर प्रदेश, बिहारवरून आले आहेत. एका फॅक्टरीत काम करताना त्यांची ओळख झाली. प्रेमसंबंधातून ते घरातून पळून गेले. रिल बघून त्यांना वाटले की सुप्रीम कोर्टात लग्न होते. जेव्हा दोघे नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात पोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना मदत करण्याऐवजी ताब्यात घेतले.
या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी वकिलांना हायकोर्टात जायला सांगितले. ते म्हणाले, अशा प्रकरणांमध्ये हायकोर्ट त्वरित सुनावणी करते. पंजाब-हरियाणामध्ये अशा केसेस झालेल्या आहेत. जर कोर्टाने दिलासा दिला नाही, तर सुप्रीम कोर्टात या. मला विश्वास आहे की, हायकोर्ट आजच सुनावणी करेल. मी रजिस्ट्रार ज्युडिशिअलला निर्देश देतो की, या दोघांची सुनावणी प्राधान्याने घ्या आणि त्यांना सुरक्षा देण्यासाठी तत्काळ पावले उचला.


























































