बंगालमध्ये अघोषित राष्ट्रपती राजवट; आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे नरकात जातील! ममता बॅनर्जी यांचा भाजपवर जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी ईद-उल-फित्रच्या निमित्त कोलकाता येथील रेड रोडवर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. बंगालकडे वाकड्या नजरेने पाहणारे नरकात जातील, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला. यावेळी त्यांनी ‘सरफरोशी की तमन्ना’ आणि ‘खुदी को कर बुलंद’ या प्रसिद्ध ओळींचा वापर करत केंद्र सरकारला थेट आव्हान दिले.

लोकांची नावे एसआयआरमधून हटवण्यात आली आहेत. या अन्यायाविरुद्ध मी कोलकाता ते दिल्लीपर्यंतच्या न्यायालयांचे दरवाजे ठोठावले आहेत. लोकांचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत. मी प्रत्येक वर्गाच्या आणि प्रत्येक समुदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आम्ही कोणालाही घाबरणार नाही आणि आपल्या हक्कासाठी सातत्याने लढत राहू, असेम ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. काही लोक पैसे देऊन मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही भाजपला तुमचे मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही. आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू. पश्चिम बंगालकडे जे लोक वाकड्या नजरेने पाहत आहेत त्यांना नरकात जावे लागेल, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी आपला संताप व्यक्त केला.

मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है। तसेच “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है…! खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रज़ा क्या है! अशा प्रसिद्ध ओळीही ममता बॅनर्जी यांनी उपस्थितांना संबोधित करताना वापरल्या.

बंगालमध्ये अघोषित राष्ट्रपती राजवट

केंद्रातील भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये अघोषित राष्ट्रपती राजवट लागू केली असून विधानसभा निवडणुकांनंतर एनआरसी आणि जनगणनेच्या नावाखाली लोकांचे नागरिकत्व हिरावून घेण्याचा मोठा कट रचला जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

केंद्राने अधिकृत घोषणा न करताच बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यांच्या सध्याच्या कारवायांवरून हे स्पष्टपणे सिद्ध होते. निवडणूक आयोगाच्या मदतीने ज्या प्रकारे प्रशासकीय फेरबदल केले जात आहेत, त्यामुळे अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या असून राज्याच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुका संपल्यानंतर मोदी सरकार एनआरसी आणि जनगणनेच्या माध्यमातून लोकांचे नागरिकत्व हिरावून घेण्याची योजना आखत आहे. हा केंद्र सरकारचा एक खोलवर रचलेला कट असल्याचा आरोप त्यांनी केला.

सामना अग्रलेख – प. बंगालातील लढाई, निवडणूक आयोगाचे अराजक

निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या तालावर काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासकीय बदल्यांमुळे निवडणुकीच्या काळात निष्पक्षता आणि सुशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. भाजपचे हे पाऊल लोकशाहीसाठी घातक आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे कारभार करणे म्हणजे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.