नवल – अंटार्क्टिकाच्या अंतरंगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण

ग्रॅण्ड कॅन्यन ही अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील महादरी हे भूपृष्ठीय आश्चर्यांपैकी एक, परंतु पृथ्वीवरच्या खोल सागरांच्या तळाशीसुद्धा भूमीच आहे. त्यामध्ये आणि पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण भागातील ध्रुव प्रदेशातील किंवा आर्क्टिक (उत्तर ध्रुव) तसेच अंटार्क्टिक (दक्षिण ध्रुव) प्रदेशातील प्रचंड बर्फाच्या थरांखालीसुद्धा मोठमोठय़ा दऱ्या आहेत.

अंटार्क्टिकाचं उदाहरण घेतलं तर तिथले घट्ट बर्फाचे थर सुमारे दोन किलोमीटर जाडीचे आहेत. त्याखाली म्हणजे हिमपृष्ठापासून चार हजार मीटर खोलवर अनेक ‘कॅन्यन’ आढळतात. सर्वसाधारणपणे दरीला ‘व्हॅली’ असं म्हटलं जातं आणि कॅन्यन किंवा कॅनियन म्हणजेसुद्धा दरीच. मग त्या दोन्हीत फरक काय? तो असा की, एरवी आपण ज्या दऱया पाहतो त्याच्या उतारांवरून खाली-वर करता येतं. मात्र ‘कॅन्यन’च्या दोन किंवा चहूबाजूला सरळ (स्टीप) कडे कातळ अथवा माती-मुरुमाचे विविध थर असतात. क्वचित एखादा उतार असतो किंवा कृत्रिमरीत्या तयार करावा लागतो.

पृथ्वीवरच्या कॅन्यन जशा रोरावत्या नद्यांच्या प्रवाहांनी बनतात तशाच सागरतळीच्या किंवा बर्फाळ प्रदेशाच्या अंतरंगातील ‘कॅन्यन’ पाणी आणि बर्फामुळे खडक फोडून पाण्याच्या सततच्या घुसळणीतून निर्माण होतात. अंटार्क्टिका खंडातील दाट बर्फरचनेखाली अशा काही कॅन्यन (महादऱया) असतील याची कल्पना पूर्वी नव्हती. अगदी गेल्याच वर्षी (2025) एका अभ्यासातून अंटार्क्टिकाच्या अंतरंगातील 332 कॅन्यन शोधून काढण्यात आल्या. हे संशोधन गुगल माहितीनुसार अमेरिकेतील बार्सिलोना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने केलं. त्यातून उष्ण समुद्री प्रवाहांमुळे तिथलं बर्फ कसं वितळतं तेही समजलं. यातील बऱयाच दऱया इंग्रजी ‘यू’ (ळ) आकाराच्या असून अधिक खोल आहेत.

यामधील डेन्मन ग्लेशियरच्या तळाशी असलेली महादरी समुद्रसपाटीपासून 3500 मीटर खोलवर गेली आहे. त्याचा माहितीपूर्ण व्हिडीओसुद्धा आता उपलब्ध आहे. रेडिओ एको साऊंडिंग तंत्राचा वापर करून 30 हजार फुटांच्या परिसरातील कॅन्यनचा शोध लावला गेला. अंटार्क्टिकावर ‘लेक एनिग्मा’च्या (गूढ तलाव) तळाशी खोल पाणी आणि सूक्ष्म जीवही आढळले. ते कमी ऑक्सिजनवर तग धरून असतात. या संशोधनासाठी रेडिओ लहरींच्या एको साऊंडिंग तंत्राबरोबरच उपग्रहाच्या ‘रिमोट सेन्सिंग’ यंत्रणेचाही उपयोग झाला. पृथ्वीवरच्याच किती किती गोष्टी आपल्याला अजून जाणून घ्यायच्या आहेत हे लक्षात येतं.