बंगालला टार्गेट करणारे नरकात जातील, ममता बॅनर्जी यांचा मोदींवर जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार हेच सर्वात मोठे घुसखोर आहेत. एसआयआरच्या आडून ते लोकांचे अधिकार हिसकावून घेत आहेत. त्यांचे हे डाव कदापि यशस्वी होणार नाहीत. बंगालला टार्गेट करणाऱयांना नरकात जावे लागेल,’ असा जोरदार हल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोदींवर केला.

ईदच्या निमित्ताने कोलकात्यात झालेल्या एका समारंभात त्या बोलत होत्या. ‘एसआयआर हा पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया ताब्यात घेण्याचा मोठा डाव आहे. त्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात आहेत. आम्ही त्या विरोधात लढत आहोत. ही लढाई आम्ही कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत नेली आहे, असे सांगत लोकांच्या हक्कांचे संरक्षण होईल,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

‘बंगाल एकतेवर विश्वास असलेले राज्य आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख हे सगळे इथे गुण्यागोविंदाने राहतात. तृणमूल काँग्रेस या सगळय़ांच्या सोबत आहेत. सामाजिक सौहार्दाची ही चौकट कदापि उद्ध्वस्त करू दिली जाणार नाही,’ असे त्यांनी ठणकावले.

मी कोणाला घाबरत नाही. जो डरते है, वो मरते हैजे लढतात, तेच आयुष्यात यशस्वी होतात.’

फक्त हिंदू नव्हे, संपूर्ण देशच संकटात

‘पश्चिम बंगालमध्ये हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणी म्हणतो मुस्लिम संकटात आहेत, कोणी म्हणतो हिंदू संकटात आहेत. प्रत्यक्षात संपूर्ण देश संकटात आहे. लोकांनी धर्माचा चष्मा काढून ठेवावा,’ असे आवाहन तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी केले.