Ashok Kharat Case – फडणवीसांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही; संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. रविवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

अशोक खरात प्रकरणाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या आधीपासून महाराष्ट्राची भूमिका पुरोगामी, सुधारणावादी आणि विज्ञानवादी राहिली आहे. असाच महाराष्ट्र आपण घडवला. अशावेळेला जर महाराष्ट्रात भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात सत्ताधारी सहभागी होत असतील तर त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना सहआरोपी केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातील भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही.

अशोक खरात प्रकरण काय होते हे आम्हाला माहिती नाही अशी पळवाट मंत्री किंवा इतर लोक काढत आहेत. ही पळवाट चुकीची आहे. या प्रकारचा पहिला गुन्हा त्यांच्यावर 2003 मध्ये दाखल झालेला आहे. नाशिकमधील एका वृत्तपत्रामध्ये खरातच्या या कारनाम्यांची एक लेखमाला प्रसिद्ध झाली, तेव्हा त्या पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. गुन्हा 2003 मध्ये दाखल झालेला असेल आणि तरीही जर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडे जात असतील, त्यांच्या पायावर डोके ठेवत असतील, पूजा-विधी करत असतील, तंत्र-मंत्री जादूटोणा करत असतील या सगळ्यांना सह आरोपी केले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे एक सक्षम अधिकारी आहेत. त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते उखडून टाकतात. त्यामुळे मुख्य आरोपी पकडला गेला असून त्याच्या जबाबाबत कोणाचीही मोठी नावे आली तरी ती दडपली जाणार नाहीत. माझा नाशिकच्या पोलीस आयुक्तांवर विश्वास आहे.
दीपक केसरकर यांच्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. केसरकर आमच्या सरकारमध्ये होते, ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये पळून गेले हे सगळे खरे असले तरीही ज्यांना या गोष्टीचा छंद होते त्यांचा एक गट एकत्र झाला आणि ते बाहेर गेले, असेही राऊत म्हणाले.