Israel Iran War – आता ट्रम्प घाबरले…अल्टिमेटमनंतर इराणचा आक्रमक पलटवार; तेलकोंडीसह पाणीकोंडी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल इराण युद्धात आता होर्मुझची सामुद्रधुनी संवेदनशील मुद्दा ठरत आहे. ही सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर इराणने आखाती देशांच्या क्षारविरहितीकरण प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी देत प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रकल्प आखाती देशांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य पुरवठा स्रोत आहेत.या प्रकल्पावर हल्ला झाला, तर सर्व आखाती देशात गंभीर मानवी संकट निर्माण होऊ शकते.

ट्रम्प यांनी संतापाच्या भरात इराणचे वीज प्रकल्प उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर इराणने आखाती देशांच्या वर्मावर बोट ठेवत दुखती नस दाबली आहे. या युद्धामुळे आता आखाती देशांच्या घशाला कोरड पडणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर, इराणने आता जबरदस्त पलटवार केला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

ट्रम्प यांनी इशारा दिला की, इराणने ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर अमेरिका त्यांचे वीज प्रकल्प “नष्ट” करेल. तथापि, इराणने या धमकीला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. इराणी लष्कराने सांगितले आहे की, जर त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर ते अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या ऊर्जा, आयटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खारपाणी शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करतील. याचा अर्थ असा की, आता हे युद्ध थेट पाणीपुरवठ्याचे मोठे संकट निर्माण करण्याची शक्यता आहे.

इराण सध्या प्रत्येक हल्ल्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. जर त्यांच्या तेल प्रकल्पांवर हल्ला झाला, तर अरब देशांच्या तेल आणि वायू प्रकल्पांवरही हल्ला होतो. त्यामुळे, हे निश्चित आहे की जर इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर ते त्याच प्रकारे प्रत्युत्तर देईल. सौदी अरेबियामध्ये ड्रोन हल्ले वारंवार होत आहेत.

आखाती देश तेलाने समृद्ध आहेत, पण त्यांच्याकडे पिण्याचे पाणी नाही. खारपाणी शुद्धीकरण प्रकल्प त्यांची जीवनरेखा आहेत. ते खारट समुद्राच्या पाण्याला पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करतात. सौदी अरेबिया आपल्या पिण्याच्या पाण्यापैकी सुमारे ७०% पाणी या प्रकल्पांमधून मिळवते. कुवेत ९०%, ओमान ८६% पाणी मिळवते आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे जर या प्रकल्पांवर हल्ला झाला, तर काही दिवसांतच संपूर्ण शहरांमधील पाणी संपू शकते. तज्ञांच्या मते, तेलाचा पुरवठा थांबण्यापेक्षा पाण्याचे संकट अधिक धोकादायक असेल, कारण पाण्याशिवाय जनजीवन ठप्प होईल.

या युद्धाचे रूपांतर ‘पायाभूत सुविधांच्या युद्धात’ झाले, तर त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक असतील. पाणीपुरवठ्यातील संकटामुळे काही दिवसांतच प्रमुख शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. तसेच पर्यावरणीय धोकेही वाढतील. त्यामुळे अमेरिकेचा अल्टिमेटम आणि इराणचे आक्रमक प्रत्युत्तर यामुळे जगाची चिंता वाढली आहे.