‘नरकातला स्वर्ग’च्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचे आज दिल्लीत प्रकाशन; कपिल सिब्बल, अरविंद केजरीवाल, दिग्विजय सिंह यांची विशेष उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्ती उद्या प्रकाशित होत आहे. दिल्लीतील कॉन्स्टिटय़ुशन क्लब, मावळणकर सभागृह येथे हा प्रकाशन सोहळा होईल.

अनुवादित पुस्तकामध्ये चार प्रकरणे नव्याने जोडण्यात आली असून प्रकाशनाआधीच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पुस्तकाबाबत उत्सुकता वाढली आहे. ‘अनलाईकली पॅराडाईज’ आणि ‘नरक में स्वर्ग’ या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होणार असून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार दिग्विजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन, खासदार जया बच्चन, 4 PM न्यूजचे मुख्य संपादक संजय शर्मा यांची या सोहळय़ाला विशेष उपस्थिती असणार आहे.

तुरुंगातही लेखणी चालली !

भाजपच्या सुडाच्या राजकारणातून ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. 100 दिवस त्यांना आर्थर रोड तुरुगांत ठेवण्यात आले होते. तुरुंगाच्या चार भिंतीच्या आतही त्यांची लेखणी थांबली नव्हती. तिथे आलेल्या अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिले आणि त्यातूनच ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक साकारले. या पुस्तकाची मराठी आवृत्ती हातोहात विकली गेली. देशभरात पुस्तकाची चर्चा झाली. वाचकांच्या आग्रहाखातर आता हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीत अनुवादित करण्यात आले आहे.

चर्चा तर होणारच

जगदीप धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र धनखड मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घेत होते. त्यामुळे ईडी चौकशीचा धाक दाखवून त्यांना पद सोडण्यास भाग पाडण्यात आले, असा गौप्यस्पह्ट संजय राऊत यांच्या या पुस्तकात करण्यात आला आहे. याबाबत हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रभाकर कुमार मिश्रा यांनी खास पोस्ट केली आहे. उपराष्ट्रपतींना अशा प्रकारे पदावरून हटवले असे या देशात कधीच घडले नाही. हा सगळाच प्रकार गंभीर आहे आणि त्याला संजय राऊत पुस्तकातून वाचा पह्डत आहेत. पुस्तकात जे लिहिलं जातं त्यावर लोक विश्वास ठेवतात. त्यामुळे या पुस्तकाची चर्चा तर होणारच, असे मिश्रा यांनी व्हिडीओ पोस्टमध्ये नमूद केले.

धनखड यांना राजीनामा का द्यावा लागला?

निर्दोषांना गुन्हेगार ठरवण्यासाठी जुलमी सिंहासने कोणत्या थराला जाऊ शकतात, किती हीन पातळी गाठू शकतात याचे थरारक चित्रण पुस्तकात आहे. जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा का द्यावा लागला याचा गौप्यस्पह्ट नव्या आवृत्तीत करण्यात आला आहे.

स्थळ ः मावळणकर सभागृह, कॉन्स्टिटय़ुशन क्लब

वेळ ः सायंकाळी 6 वाजता