मुंबईकर, ठाणेकरांची पुन्हा लाहीलाही, उष्णतेची लाट परतली…! हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे आणि पालघर परिसरात पुन्हा उष्णतेची लाट आली आहे. पुढील दोन दिवसांत महानगर क्षेत्रात उष्णतेत वाढ होणार आहे. मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट धडकणार आहे. कमाल तापमानाचा पारा 38 अंशांच्या पातळीवर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तवला आणि मुंबई व ठाणे शहराला ‘येलो अलर्ट’ जारी केला. तापमानवाढीमुळे मुंबईकर, ठाणेकरांची लाहीलाही होणार आहे.

यंदाच्या हंगामात उष्णतेने मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासूनच कहर केला आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच कमाल तापमान 42 अंशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. त्यानंतर काही दिवस तापमानात घसरण झाली आणि मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळाला. आता पुन्हा शहर व उपनगरांत तीव्र उन्हाचे चटके बसणार आहेत. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे शहरात उष्णतेची लाट धडकणार आहे. त्याअनुषंगाने भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई आणि ठाणे शहराला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी मुंबईचा पारा 38 अंशांची कमाल पातळी गाठेल, तर ठाण्याचे तापमान 39 अंशांच्या पातळीवर नोंद होईल. पुढील ठाण्याचा पारा 35-36 अंशांच्या आसपास राहणार आहे. मुंबईचे तापमान 25 मार्चपर्यंत 35 अंशांच्या पातळीवर राहील. त्यानंतर तापमानात घसरण होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

रविवार सुट्टीत उन्हाचा ताप

मागील आठवडाभर तापमान सरासरी पातळीवर राहिले होते. त्यामुळे मुंबईकरांनी सुखद वातावरण अनुभवले होते. रविवारच्या सुट्टीत मात्र मुंबईकरांना उन्हाचा ताप सहन करावा लागला. सांताक्रूझमध्ये सरासरीपेक्षा 4 अंशांनी अधिक म्हणजेच 36.4 अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. किमान तापमानातही वाढ झाली होती. रविवारी अनेक ठिकाणी लग्न, साखरपुडा आदी समारंभ होते. या समारंभाच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर कुटुंबीय घराबाहेर पडले होते. त्यांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. यात लहान मुले आणि वृद्धांचे हाल झाले.