
चैत्र महिन्यातील रविवारी भरलेल्या देवरुखच्या आठवडी बाजारात आज खास उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यंदाच्या बाजाराचे वैशिष्टय़ म्हणजे स्थानिक रायवळ कैरीचे आगमन. संगमेश्वर तालुक्यातील मेघी, कनकाडी, आंगवली, सायले, काटवली, निवे, काsंढरण, चाफावली परिसरातून देवरुखला कैऱया आलेल्या आहेत.
कोकणातील रायवळ कैरी हापूसपेक्षाही अधिक मानाची मानली जाते. मात्र या वर्षी बदलत्या हवामानाचा फटका रायवळलाही बसला असून उत्पन्न घटले आहे. तरीही कोणत्याही रासायनिक खते किंवा औषधांचा वापर न करता, निसर्गाशी लढा देत टिकून राहिलेल्या रायवळ कैरीला बाजारात तब्बल 100 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे स्थानिक शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजारात कैरी विक्रीसाठी शेतकऱयांची लगबगही दिसून येत आहे. दरम्यान, हापूस आंब्याला विविध संकटांचा सामना करावा लागत असताना रायवळ हा कोकणवासीयांसाठी मजबूत पर्याय ठरू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

























































