
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला महिलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक झाल्यानंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटल्या. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही या प्रकरणानंतर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ‘महाराज’ पकडले गेले तरच भोंदू, मग आधी कोण असतात? असे त्यांनी म्हटले आहे.
अतुल कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. ‘महाराज पकडले गेले तरच ‘भोंदू’? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? शिवाय जे लोक पकडले जातच नाहीत त्यांचं काय?’ असा सवाल अतुल कुलकर्णी यांनी पोस्टद्वारे केला आहे.
भोंदू महाराजांबरोबर त्यांच्या अंधभक्तांवरही कुलकर्णी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. ‘ज्यावेळी कुणी ‘महाराज’ भोंदू ‘निघतात’,तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात-भागीदार, पिडीत, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी,भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.‘श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंध श्रद्धांमध्ये अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे? आंधळं होणाऱयांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?’ असेही अतुल कुलकर्णी यांनी नमूद केले आहे.

























































