
कोयना धरणाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिह्याच्या सिंचनाची वाढती मागणी लक्षात घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यात नदी विमोचकातून आणखी 1500 क्युसेक पाणी सोडण्याची योजना असल्यामुळे कोयना नदीत एकूण 3600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सांगली जिह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोयना धरणाच्या स्टीलिंग बेसिनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता विसर्ग वाढविणे शक्य झाले आहे. आत्तापर्यंत मर्यादित क्षमतेने सुरू असलेल्या योजनांना आता पूर्ण क्षमतेने चालवता येणार आहे. सध्या टेंभू योजनेचे सुमारे 53 टक्के, ताकारी योजनेचे 63 टक्के आणि म्हैसाळ योजनेचे जवळपास 50 टक्के पंप कार्यरत होते. मात्र, वाढीव विसर्गानंतर या तिन्ही योजनांचे पंप पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. उन्हाळी हंगामासाठी पाण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. कोयना धरणातून टेंभू आणि ताकारी योजनांना पाणीपुरवठा होणार आहे. म्हैशाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा धरणातून संयुक्तपणे पाणी दिले जाणार आहे.
सध्या कोयना धरणात 62.51 टीएमसी, तर वारणा धरणात 17.77 टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. वारणा धरणातून 1770 क्युसेक विसर्ग सुरू असून, दानोळी बंदरावर सुमारे 800 क्युसेक पाणी पोहोचत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता वाढीव विसर्ग शेतकऱयांना दिलासा देणारा ठरणार आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. तसेच कोयना धरणाच्या स्टीलिंग बेसिनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता विसर्ग वाढवणे शक्य झाले आहे. मागणीनुसार धरणातून कोयना नदीत 3600 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.
– चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ
























































