
मध्य प्रदेशात एका सरकारी कार्यालयातील अजब कारभार आणि अक्षम्य हलगर्जीपणा उघड झाला आहे. आरोग्य विभागातील सीएमएचओ अधिकारी डॉ. ममता तिमोरी निवृत्ती घ्यायला विसरल्या. त्यांच्या विभागालादेखील निवृत्तीचा विसर पडला. निवृत्तीचे वय उलटून 2 वर्षे गेल्यावरही डॉ. ममता तिमोरी यांनी खुर्ची सोडली नव्हती. या कालावधीत सगळे कायदेशीर अधिकार त्यांच्याकडे होते. त्यांनी सगळ्या फाईल्सवर स्वाक्षऱया केल्या. मात्र तरीही विभागाला जाग आली नाही. आता अचानक त्यांना निवृत्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने खळबळ उडाली.
मध्य प्रदेशच्या सागर जिह्यातील ही घटना आहे. डॉ. ममता तिमोरी यांनी 2024 मध्ये निवृत्त होणे अपेक्षित होते, पण त्या 2026 पर्यंत सेवेत राहिल्या. आरोग्य विभागाच्या मुख्यालयाचे रेकॉर्ड्स नुकतेच तपासण्यात आले. तेव्हा डॉ. तिमोरी यांचा कार्यकाळ केव्हाच संपला असल्याचे लक्षात आले. वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत ही माहिती पोहोचताच विभागात खळबळ उडाली. यानंतर घाईगडबडीत त्यांचा निवृत्ती आदेश काढण्यात आला. त्यांना जबरदस्तीने निवृत्ती घेण्यास लावण्यात आली.






















































