
जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणने आता २ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १६.७ कोटी रुपये) इतके प्रचंड ‘प्रवास शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या एका वरिष्ठ खासदाराने दिलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
इराणच्या संसदेतील राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाद्दीन बोरुजेर्दी यांनी एका कार्यक्रमात ही खळबळजनक माहिती दिली. बोरुजेर्दी यांच्या मते, “युद्धाचा खर्च मोठा असतो, त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क वसूल करणे हा इराणचा अधिकार आहे. त्या प्रत्येक जहाजाला या मार्गावरून जाण्यासाठी २ दशलक्ष डॉलर्स मोजावे लागत आहेत.
इराणने ही सामुद्रधुनी ‘शत्रू राष्ट्रांच्या’जहाजांसाठी पूर्णपणे बंद केली आहे, तर काही मित्र राष्ट्रांच्या जहाजांना शुल्क भरून परवानगी दिली जात असल्याचे वृत्त आहे.
जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या (LNG) व्यापारापैकी सुमारे २०% व्यापार याच मार्गावरून होतो. या मार्गातील अडथळ्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
जागतिक तणाव वाढला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हा सागरी मार्ग 48 तासाच्या आत खुला करण्याचा इशारा दिला असतानाच, इराणने शुल्क आकारणीचा हा नवा पवित्रा घेतला आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
























































