सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक प्रकरणाचे विधानपरिषदेत पडसाद, भाजप व मिंधे गट एकमेकांना भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या निर्णायक दिवशी भाजप आणि शिंदे गटात अभूतपूर्व राडा झाला. भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता काबीज केली. यावेळी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले होते. या प्रकरणावरून सोमवारी विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच सभागृहात शिंदे गट व भाजपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी आरोप प्रत्यारोप केल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. शिंदे गटाकडून शंभूराज देसाई, उदय सामंत, मनिषा कायंदे तर भाजपकडून जयकुमार गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान या गोधंळानंतर विधानपरिषदेचं कामकाज थांबवण्यात आलं. त्यानंतर शिंदे गट व अजित पवार गटाकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

सभापतींनी मिंधे गटाला बोलू दिले नाही

सभागृहात भाजप व मिंधे गटामध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर हा विषय थांबवण्याचे आदेश सभापती राम शिंदे यांनी दिले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर बोलताना म्हणाले की, सभागृहात मंत्र्याला मारहाण धक्काबुक्की झाल्याचे आपण कधी ऐकलं आहे का? एवढं होऊनही जर तुम्ही आम्हाल बोलू देत नसाल तर आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो आणि घरी जातो. राज्याच्या इतिहासात या विधीमंडळाच्या इतिहासात. सरकारमधल्या मंत्र्याला सरकारचे पोलीस मारहाण करत असतील, धक्काबुक्की करत असतील, इजा पोहचवत असतील तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा. दहा दहा पोलीस आम्हाला खेच होते. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडत नाही असं पोलीस मंत्र्याला पकडत होते. त्या पोलीस अधिक्षकाला तत्काळ निलंबीत करा.

एसपी तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी

साताऱ्यात भाजपने पोलीस आणि प्रशासनाचा पुरेपूर वापर करत सत्ता बळकावली आहे. 100 पेक्षा जास्त पोलिसांनी आमच्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी शंभुराजे देसाई यांनी केली.