
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धाचा परिणाम आता थेट हिंदुस्थानी प्रवाशांवर दिसू लागला आहे. हिंदुस्थानातून युरोप, अमेरिका आणि इतर देशांकडे जाणाऱ्या विमानप्रवासाचा कालावधी वाढला असून तिकिटांचे दरही मोठ्या प्रमाणात महागले आहेत. या संघर्षामुळे इराण आणि आसपासच्या भागातील हवाई क्षेत्रावर निर्बंध आले आहेत. परिणामी, विमान कंपन्यांना थेट मार्ग टाळून लांब वळसा घ्यावा लागत आहे. यामुळे पूर्वीपेक्षा 3 ते 4 तास अधिक वेळ लागतो आहे. काही प्रकरणांमध्ये पायलट्सना सलग 11 तासांहून अधिक उड्डाण करावे लागत असल्याने त्यांच्या कामाच्या ताणातही वाढ झाली आहे.
याचाच परिणाम तिकिटांच्या किमतींवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचे भाडे आता ₹1 लाखांपर्यंत पोहोचले असून काही मार्गांवर ते दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. इंधन खर्चात वाढ आणि लांब मार्गामुळे विमान कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाला मोठे नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एका अंतर्गत पत्रात, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी अमेरिका-इराण युद्धाचा एअरलाइनवर होणाऱ्या परिणामाबद्दल सविस्तर माहिती दिली. विल्सन यांच्या मते, युद्ध सुरू झाल्यापासून 2,500 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एअरलाइन आपल्या मध्य पूर्वेतील नेहमीच्या वेळापत्रकाच्या केवळ 30 टक्केच उड्डाणे चालवू शकत आहे. अनेक देशांमधील हवाई क्षेत्र आणि विमानतळे एकतर पूर्णपणे बंद आहेत किंवा अत्यंत धोकादायक घोषित करण्यात आली आहेत, ज्यामुळे उड्डाणे रद्द करावी लागत आहेत.
युद्धाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित नाही. असुरक्षित हवाई क्षेत्र टाळण्यासाठी एअर इंडियाच्या यूके, युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना आता लांबच्या मार्गांनी जावे लागत आहे. विल्सन यांनी स्पष्ट केले की स्पॉट मार्केटमध्ये जेट इंधनाच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. लांबच्या मार्गांमुळे केवळ इंधनाचा वापरच वाढला नाही, तर प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या वाढला आहे. याचा सर्वात मोठा आर्थिक फटका पुढील महिन्यापासून कंपनीच्या ताळेबंदात दिसण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती तात्पुरती असली तरी युद्ध दीर्घकाळ चालल्यास विमान प्रवास आणखी महाग होण्याची शक्यता आहे. एकूणच या युद्धामुळे केवळ जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्था नाही, तर सामान्य प्रवाशांचाही प्रवास अधिक खर्चिक आणि वेळखाऊ बनला आहे.























































