
कल्याण रेल्वे स्थानकावर दुपारी धक्कादायक आणि थरारक प्रकार घडला. एका ३५ वर्षीय अज्ञात तरुणाने थेट ओव्हरहेड इक्विपमेंट खांबावर चढत जीवघेणा स्टंट केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे दीड तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. माथेफिरू तरुण ओव्हरहेड खांबावर चढल्याने दीड तास ‘मरे’ची वाहतूक ठप्प झाली. आधीच मेगाब्लॉक, त्यात माथेफिरूचा ताप यामुळे कल्याण स्थानकात अक्षरशः लोच्या झाला.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अनर्थ टाळण्यासाठी फलाट क्रमांक १ आणि २ वरील विद्युत पुरवठा तत्काळ खंडित केला. त्यामुळे डाऊन लाईनवरील रेल्वे सेवा दीड तास ठप्प झाली. या घटनेचा परिणाम म्हणून अनेक लोकल, दोन मेल आणि एक्स्प्रेस गाड्या काही उशिराने धावल्या. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस, आरपीएफ, स्थानिक पोलीस तसेच केडीएमसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना चकवा देत माथेफिरू तरुण पुन्हा फलाट क्रमांक ३ आणि ४ वरील ओव्हरहेड इक्विपमेंट खांबावर चढला. त्याच्या मागावर अग्निशमन दलाचे अधिकारी सीडी लावून चढले असता तो आणखीन वेगाने दुसऱ्या रेल्वे लाईनवर जात होता. पोलिसांनी जवानांकडून त्याला थांबण्याच्या किंवा खाली उतरण्याच्या सूचना केल्या जात होत्या त्याकडे तो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पुढे पुढे जात होता. अखेर फलाट क्रमांक ४ वरील खांबावर असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो खाली रुळावर कोसळला.
स्टंट अंगाशी आला
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माथेफिरू तरुणाने अचानक ओव्हरहेड इक्विपमेंट खांबावर चढण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहताच फलाट क्रमांक १ आणि २ वर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. प्रवाशांची गर्दी झाली. काही प्रवासी तर त्याला समजावण्यासाठी रेल्वे रुळांवरही उतरले होते. मात्र तरुणाने सर्वांकडे दुर्लक्ष करत लोखंडी सांगाड्यावरून एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर उड्या मारत स्टंट करत होता. हा स्टंट अखेर त्याच्या अंगाशी आला.
सायन रुग्णालयात उपचार
गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सायन येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून रेल्वे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






























































