
ठाणे जिल्ह्यात ३६ आश्रमशाळा आहेत. आदिवासी तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी शासन करोडो रुपये खर्च करत असले तरी आश्रमशाळाची परिस्थिती चिंताजनक आहे. आश्रमशाळांच्या इमारती धोकादायक असून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रोजचा दिवस काढावा लागतो. त्यातच मुलांना मिळणारे निकृष्ट जेवण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, शिक्षकांची कमतरता यामुळे आश्रमशाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ तालुक्यातील अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळां चा समावेश होतो. यापैकी अनुदानित आश्रमशाळा १३ तर शासकीय आश्रमशाळा २३ अशा एकूण ३६ आश्रमशाळांचा समावेश होतो. मात्र सद्यस्थितीत बहुतांश आश्रमशाळांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे आश्रमशाळांचा आठ लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात येणारा तातडीचा निधी नेमका कुठे जातो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुमित म्हात्रे यांनीदेखील राज्यपाल जिष्बुदेव वर्मा यांची भेट घेऊन आश्रमशाळांमध्ये तातडीने सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली.
उच्चस्तरीय तपासणी सुरू
शहापूर तालुका हा अतिशय दुर्गम, डोंगराळ व पैसाअंतर्गत असलेला तालुका आहे. या ठिकाणी शहापूर, आंबिवली, डोळखांब, शिरोळ, पेंढरघोळ, कोठारे, टाकीपठार, शेणवा, विहीगाव-माळ, सावरोली या ठिकाणी शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा आहेत. या शाळांची उच्चस्तरीय तपासणी सुरू असून तालुक्यातील डोळखांब सावरपाडा आश्रमशाळा या ठिकाणी नाशिक येथील प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, समोपदेशनाची, अंघोळीला गरम पाणी, आहारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे शेरे पुस्तकात नमूद केले आहे.






























































