2024 पासून नवी मुंबईकरांनी शुद्ध हवा घेतलीच नाही; पहाटे, सकाळी प्रदूषणाचा उच्चांक, तीन महिन्यांत एक्यूआय 51 ते 309 दरम्यान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Air Pollution Case

स्वच्छतेमध्ये देशात तिसऱ्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांनी २०२४ पासून शुद्ध हवाच घेतली नाही. सप्टेंबर २००४ मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा १४ दिवस ५० च्या खाली होता. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत तो ५० च्या खाली न उतरता त्याचा आलेख चढता राहिला आहे. चालू वर्षात तीन महिन्यांमध्ये फक्त फेब्रुवारी महिन्यात एक्यूआय ५१ ते ५६ च्या दरम्यान राहिला. त्यानंतर ११ मार्च रोजी एक्यूआय थेट ३०९ पर्यंत पोहोचला होता. हवा खराब झाल्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. पहाटे आणि सकाळी हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात २०२१ मध्ये ११ दिवस, २०२२ मध्ये ४५ दिवस, २०२३ मध्ये १७दिवस आणि २०२४ मध्ये ५९ दिवस हवा एकदम शुद्ध होती. या दिवसांमध्ये एक्यूआय हा ५० च्या खाली होता. मात्र हवेत विषारी घटक आणि धुलिकण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ऑक्टोबर २०२४ पासून एक्यूआय ५० च्या खाली गेलाच नाही. दिवसेंदिवस नवी मुंबई शहराची हवा खराब होऊ लागल्याने त्याचा मोठा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. खोकला, खशात खवखवणे, श्वासोच्छवास त्रास होणे या विकारांनी नवी मुंबईकरांना ग्रासले आहे. हवा विषारी झाल्यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांना मोठा त्रास होत आहे. वाढत चाललेला एक्यूआय कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र अद्याप एक्यूआयचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.

गेल्या तीन महिन्यांत शहरात एकच दिवस हवा समाधानकारक राहिली. १२ दिवस मध्यम स्वरूपाची होती. ४६ दिवस आरोग्याला अपायकारक राहिली. २० दिवस हवेची पातळी अत्यंत खालावलेली होती.
नवी मुंबई विमानतळासाठी उलवे परिसरातील अनेक टेकड्या फोडण्यात आल्या. त्या ठिकाणी शेकडो दगडखाणी रात्रंदिवस धूळ ओकत आहेत. परिणामी उलवे परिसरात नेहमीच धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
खडी आणि डस्ट पावडरची वाहतूक करताना नियमांचे पालन केले जात नाही. डंपर खडी आणि डस्ट पावडर रस्त्यावर सांडत धावत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या मागे चालणारे दुचाकीस्वार यांचे डोळे धुळीने भरत आहेत.
नवी मुंबई आणि परिसरात सध्या सुरू असलेल्या अनेक बांधकाम साईटवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन केले जात नाही. त्यामुळेही हवेत धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे.
धूळ ओकणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. अनेक प्रकल्पांचे काम थांबवण्यात आले आहे तरी वायुप्रदूषण कमी झालेले

रस्त्यांची धुलाई केली
शहरात मध्यंतरी वातावरणात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे एक्यूआयचा आलेखही मोठ्या प्रमाणात वाढला होता. हा आलेख कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मशीनने रस्त्यांची धुलाई केली. रस्त्यांवर कृत्रिम पाऊस पाडला. मात्र त्यानंतरही प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले नाही. प्रत्येक बांधकाम साईटवर हवेची गुणवत्ता दर्शवणारा फलक लावणे महापालिका प्रशासनाने बिल्डरांना सक्तीचे केले आहे.