
वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यात सुरू असलेला वाद आज पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत उफाळून आला. म्हात्रे यांच्या प्रयत्नातून उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला भाजपच्याच नगरसेवकांनी दुसऱ्यांदा थेट कात्रजचा घाट दाखवला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत नव्याने उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. या घोषणेलाही भाजपच्या नगरसेवकांनी थेट नवी मुंबईबाहेरची वाट दाखवली.
गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीद दिनानिमित्त खारघर येथे आयोजित केलेल्या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरू तेग बहादूर यांचे नाव नवी मुंबईत उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. बेलापूर येथील सेक्टर १५ मध्ये नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहत आहे. त्याचाही चौगुले यांनी प्रस्तावात उल्लेख केला होता.
या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपचे नगरसेवक सूरज पाटील यांनी मुख्यमंत्री रुग्णालयाच्या भूखंडाचा उल्लेख केलेला नाही, अशी हरकत घेतली. त्याला सभागृह नेते सागर नाईक यांनी दुजोरा दिला. सिडकोची नवी मुंबई फक्त दिघ्यापासून बेलापूरपर्यंत नाही तर पनवेलपासून तळोजा, कळंबोली, उरणपर्यंत आहे. त्यामुळे त्या भागात उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार नाव देण्यात यावे, अशी सुधारणा या प्रस्तावात करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
























































