
BCCI ने IPL 2026 च्या पहिल्या टप्प्यासाठी ‘फॅन पार्क’ची अधिकृत घोषणा केली आहे. चाहत्यांना स्टेडियममध्ये न जाताही तसाच रोमांचक अनुभव मिळावा, यासाठी 11 राज्यांमधील 15 शहरांची निवड करण्यात आली आहे. हे फॅन पार्क 28 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत एकूण तीन आठवड्यांच्या वीकेंडला (शनिवार-रविवार) आयोजित केले जातील. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चारही विभागांत दर आठवड्याला पाच शहरांमध्ये हे आयोजन असेल.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्रातील नागपूर आणि रत्नागिरी या दोन शहरांना फॅन पार्कचे यजमानपद मिळाले आहे. पहिल्या आठवड्यात (28 आणि 29 मार्च) नागपूरच्या मेकोसाबाग मेथोडिस्ट हायस्कूल मैदानात स्क्रीनिंग होईल, तर तिसऱ्या आठवड्यात (11 आणि 12 एप्रिल) रत्नागिरीतील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलात चाहत्यांना आयपीएलचा आनंद घेता येईल. याशिवाय हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, ओडिसा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांतील विविध शहरांची यादीत समावेश आहे.
PSL वर दहशतवादाचे सावट; परदेशी खेळाडूंना थेट धमकी, स्पर्धेतून त्वरित माघार घ्यावी
वर्ष 2015 पासून सुरू झालेली ही फॅन पार्कची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. येथे केवळ मोठ्या पडद्यावर लाइव्ह मॅचच दिसणार नाही, तर म्युझिक, फूड कोर्ट, मुलांसाठी गेम झोन आणि 360° फोटो बूथची सोय असेल. याव्यतिरिक्त, क्रिकेट प्रेमींसाठी व्हर्च्युअल बॅटिंग, बॉलिंग नेट आणि फेस पेंटिंग यांसारख्या उपक्रमांमुळे चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानात असल्याचा फिल मिळणार आहे. विनामूल्य प्रवेश असलेल्या या उपक्रमामुळे आयपीएलचा उत्साह घराघरात पोहोचण्यास मदत होत आहे.


























































