
मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसतानाच, इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत आक्रमक पवित्रा घेतला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आता युद्धपूर्व स्थितीत परतणार नाही आणि ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता कायम राहील, असे इराणने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा वाटाघाटी सुरू असल्याचा दावाही इराणने पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
इराणच्या ‘तसनीम’ या निमशासकीय वृत्तसंस्थेने एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गावर युद्धाचे सावट कायम राहणार असून, त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर प्रदीर्घ काळ जाणवेल, असा इशारा इराणने दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर आणि पॉवर प्लांटवर हल्ला करण्याचा प्लॅन तूर्तास लांबणीवर टाकल्याचे विधान केले होते. यावर भाष्य करताना इराणी अधिकाऱ्याने म्हटले की, ट्रम्प यांनी हा निर्णय कोणत्याही मानवतावादी दृष्टिकोनातून घेतलेला नाही, तर जागतिक आर्थिक बाजारपेठेच्या दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान होईल, या भीतीपोटी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे इराणने म्हटले आहे. जोपर्यंत इराण आपले संरक्षण सामर्थ्य पुन्हा प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.


























































