धक्कादायक… भाईंदर पालिका आयुक्तांची बोगस सही, बनावट स्टँप मारून 4 कोटींचा घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरा रोड पूर्व येथील मौजे नवघर येथील कोट्यवधी रुपये किमतीची जमीन बळकावण्यासाठी महापालिकेचे बनावट दस्तऐवज तयार करून शासन आणि एका बांधकाम कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तक्रारदार भद्रेश जोशी यांच्या कंपनीची मौजे नवघर येथील सर्व्हे नं. ४१५ (पार्ट), ११९/१ व नवीन सव्र्व्हे नं. ११९/बी मधील २६४० चौरस मीटर ही मिळकत आहे. या जमिनीवर २००४ पासून तक्रारदार यांनी आरबीके शाळेची इमारत उभी आहे. असे असतानाही आरोपी विनोदचंद्र दास आणि रोझी डिसोजा यांनी संगनमत करून जुन्या व्यवहारांची माहिती लपवून ही जमीन इतरांना विकण्याचा बनाव रचला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा बनावट झोन दाखला तयार केला. या बनावट दाखल्यावर पालिकेचा शिक्का, लोगो आणि चक्क महापालिका आयुक्तांची बनावट सही करून तो खरा असल्याचे भासवले.

यांच्यावर गुन्हा दाखल

जेव्हा तक्रारदार यांनी २०२४ मध्ये या जमिनीबाबत महसूल नोंदणीसाठी अर्ज केला तेव्हा आरोपींनी त्यावर आक्षेप घेतला. यातून हा सर्व फसवणुकीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जितेंद्र यादव- मीरा रोड, असिफ मिर मीरा रोड, रवींद्र गावंड- नवी मुंबई, अब्दुल मकनोजिया- मीरा रोड व विनोदचंद्र दास आणि रोझी रेन्डाल्ट डिसोजा यांच्या विरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समीर शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.