मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साताऱ्यात जी गुंडगिरी, झुंडगिरी झाली, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू विधिमंडळाच्या इमारतीत आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, साताऱ्यात जी गुंडगिरी, झुंडगिरी झाली. त्या सगळ्याचा केंद्रबिंदू विधिमंडळाच्या इमारतीत आहे. लोकशाहीचा खून झाला असं जे लोक म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनान रंगलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या पायऱ्यावर काल दोन गटाचे मंत्री, आमदार लोकशाहीचा खून झाला लोकशाहीचा खून झाला असे म्हणत होते. त्याच्यामधले काही मंत्री जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा ते हे वाघाचे कातडे पांघरलेले गर्जना करत होते की स्वाभिमान अभिमानासाठी हिंदुत्वासाठी आम्ही कसा पक्ष सोडला आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची म्हणजे कातडं पांघरलेल्या वाघांचे अक्षरशः मांजर आणि बोके झाले होते.

भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलंय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक कुठे गेला? तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा? तुम्ही तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात. आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय आणि म्याव म्याव करताय. बघा शेवटी जे तुम्ही कर्म केलंत त्या कर्माचंच हे फळ आहे असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने पोलिसांनी एका तिथल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तेच पालकमंत्री म्हणत होते की, मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसन वीर तिथे होऊन गेले. आणि त्याच्यामध्ये तिथे ग. दि. माडगुळकरांसारखे कवी जन्माला आले, कविता निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. एक सिनेमा आला होता ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’. आता साताऱ्यात जे घडलं ती संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा झालेली दिसते असेही संजय राऊत म्हणाले.

मला असं वाटतं की या सरकार मधले जे मित्र पक्ष आहेत ते फार काळ एकत्र राहणार नाहीत. त्यांना पोलिसांचा रोज रस्त्यावर मार खावा लागेल. ही फक्त सुरुवात आहे, असं दिसतय. सत्तेच्या बळावर आम्ही हवं ते करू शकतो. सत्तेच्या बळावर जर ते शिवसेना फोडू शकले, तर जे फुटले त्यांनाही फोडू शकतो आणि रस्त्यावर फोडू शकतो, हे भाजपच्या कृतीमध्ये स्पष्ट दिसलंय.

कोणाचेही अधिकार काय आहेत मला माहित नाही, पण या क्षणी आणि पोलिसांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच अधिकार मोठे आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी लाठीचार्चमध्येही जालन्यात ते होते. त्यानंतर साताऱ्यामध्ये जो ड्रगचा साठा शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हे तुषार दोषी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोषी होते. ज्या तुषार दोषीने तुम्हाला बेकायदेशीरपणे दोन वेळा मदत केली त्याच तुषार दोषीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात आणि उपसभापतींनी निलंबनाचे आदेश दिले त्यांना तो अधिकार आहे का? हा जो प्रश्न काल उपस्थित झाला तो योग्य आहे. जे काय विधिमंडळाच्या कायद्याने ज्या गोष्टी व्हायला हव्या त्या व्हायला पाहिजे. तुम्ही चेअरवर बसून मनमानी पद्धतीने निर्णय देऊ शकत नाही. जसं राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातकी निर्णय दिला, त्याच पद्धतीने विधान परिषदेच्या चेअरवरून कोणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवालाच पाहिजे.

युद्ध सुरू होऊन 25 दिवस झाले आहेत आणि 25 दिवसांनंतर आपल्या पंतप्रधानांना साक्षात्कार झाला आहे की सभागृहात जाऊन सगळ्यांसोबत आपल्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. आम्ही इतक्या दिवसांपासून सांगत आहोत की सर्वपक्षीय बैठक घ्या. तुम्ही सगळ्यांना बोलवा, जो संकट समोर आलं आहे, जगात आलं आहे ते हिंदुस्थानातही येऊ शकतं, त्याबाबत तुम्ही सर्वांशी चर्चा करा, सगळ्यांची मते घ्या. पण जेव्हा पंतप्रधानांना वाटलं की हे त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे, तेव्हा ते सभागृहात आले. आणि सगळ्यांशी बोलतील. देशाची परिस्थिती कोरोनासारखी निर्माण झाली आहे. कोरोना काळात थाळ्या-टाळ्या वाजवल्या होत्या, आता काय रिकामे सिलेंडर वाजवायचे आहेत का?

राहुल गांधींची गोष्ट बरोबर आहे. पंतप्रधान जर चर्चा करतील, तर आपल्या मनात देशाबद्दल जे प्रश्न आहेत, जी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे, त्या संदर्भातले प्रश्न आहेत, त्याची उत्तरे आपल्याला मिळाली पाहिजेत. जर तुम्ही शांततेसोबत उभे आहात, तर शांतता कुठे आहे? कुठे राहते? तुमच्या बंगल्यात आहे का? PMO कार्यालयात आहे का? देशात शांतताच नाही आहे. तुम्ही शांतता आणि विकास कुठे लपवून ठेवले आहेत, ते आम्हाला सांगा. जर तुम्ही शांततेच्या बाजूने आहात, तर हिंदुस्थानसोबत तुम्ही एकटेच आहात का? 140 कोटी जनता हिंदुस्थानसोबत आहे, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही हिंदुस्थानचे मालक नाही आहात. जर शांतता काय असते हे जाणून घ्यायचं असेल, तर महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचे चरित्र वाचले पाहिजे. पंचशीलचे तत्व वाचा, अशा भाषणांनी काय होणार? असे संजय राऊत यावेळी म्हणाले