Israel Iran War – होर्मुझची सामुद्रधुनी माझ्या आणि त्यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली असेल; ट्रम्प यांचा पुन्हा नवा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध आता जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवस इराणच्या उर्जा केंद्रावर हल्ला करू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच इराणसोबत सकारात्मक वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, इराणने याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला असून युद्ध अधिक निकराने लढण्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत नवा दावा केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सध्याच्या मध्य-पूर्व संघर्षाच्या सुरुवातीपासूनच बंद असलेला महत्त्वाचा जलमार्ग होर्मुझची सामुद्रधुनी इराणसोबतची चर्चा यशस्वी झाल्यास लवकरच उघडली जाईल. ही सामुद्रधुनी कदाचित माझ्या आणि त्यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली असू शकते, असे सांगत त्यांनी कोणत्याही देशाचा किंवा नेत्याचा उल्लेख टाळल्याने संदिग्धता वाढली आहे.

इराणसोबतची चर्चा यशस्वी झाल्यास होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच वाहतुकीसाठी खुली केली जाईल, असे ट्रम्प म्हणाले. ते पुढे म्हणाले की ही सामुद्रधुनी संयुक्तपणे नियंत्रित केली जाईल. मात्र ती नेमकी कोणाच्या नियंत्रणाखाली असेल यावर त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. कदाचित माझ्या हातात त्याचे नियंत्रण असेल. कदाचित माझ्या आणि त्यांच्याकडे म्हणजे मी आणि जो कोणी पुढचा अयातुल्ला असेल त्यांच्याकडे याचे नियंत्रण असेल, असे सांगत ट्रम्प यांनी संभ्रम निर्माण केला.

होर्मुझची सामुद्रधुनी, ज्यामधून जगातील २० टक्के तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूची वाहतूक होते, ती २८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतर जवळजवळ बंद झाली आहे. त्यामुळे आखाती देश हादरले असून त्याचे परिणाम दिसत आहे. विस्कळीत बाजारपेठा, वाढलेल्या इंधन किमती व वाढत्या जागतिक महागाईच्या भीतीमुळे जगाच्या इतर भागांवरही त्याचे परिणाम झाले आहेत.

वाटाघाटींमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, आम्ही अशा काही लोकांशी बोलत आहोत जे मला खूप समंजस आणि खंबीर वाटतात. त्यांच्यातील लोकांना ते कोण आहेत हे माहीत आहे, ते खूप आदरणीय आहेत आणि कदाचित त्यांच्यापैकी कोणीतरी अगदी आपल्या अपेक्षेप्रमाणे असेल, असे सांगत त्यांनी संभ्रमात भर पाडली.