
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी हिंदुस्थानी रेल्वेने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून पॅन्ट्री कारमध्ये सिलिंडरची कमतरता आणि सुरक्षेच्या कारणास्तव गॅसवर स्वयंपाक करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता रेल्वेने पुन्हा एकदा पॅन्ट्री कारमध्ये प्रत्यक्ष स्वयंपाक करण्याची परवानगी दिली आहे. एलपीजी (LPG) गॅसच्या उपलब्धतेत येणाऱ्या अडचणींवर मात करून प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळावे, या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी रेल्वेने आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि यानंतर आता इस्त्रायल इराण यांच्या युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेत अनेक अडचणी आल्यामुळे पॅन्ट्री कारमध्ये गॅस वापरण्यावर निर्बंध लादले होते. मात्र आता पॅन्ट्री कारमध्ये स्वयंपाक करण्याची परवानगी मिळाली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे अन्न तयार करण्यासाठी इंडक्शन स्टोव्ह आणि मायक्रोवेव्ह ओव्हन यांसारख्या विद्युत उपकरणांचा वापर केला जाईल. यापूर्वी ‘बेस किचन’मधून तयार झालेले जेवण डब्यात आणून केवळ गरम करून प्रवाशांना दिले जात होते. मात्र, अनेकदा हे जेवण ताजे नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. मात्र, आता प्रवाशांच्या मागणीचा विचार करून, रेल्वे बोर्डाने पॅन्ट्री कारमध्ये मर्यादित स्वरूपात आणि कडक सुरक्षा नियमांचे पालन करून अन्न शिजवण्यास संमती दिली आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सुविधा सुरू करण्यापूर्वी पॅन्ट्री कारमधील उपकरणांची तपासणी केली जात आहे. विशेषतः ज्या गाड्यांचा प्रवास 24 तासांहून अधिक आहे, अशा ठिकाणी प्रवाशांना ताजे आणि गरम जेवण मिळणे आता सोपे होणार आहे. यामुळे कंत्राटदारांनाही प्रवाशांच्या पसंतीनुसार जागेवरच खाद्यपदार्थ तयार करता येतील. ज्यामुळे अन्नपदार्थांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्वयंपाक करताना अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असेल. पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, गॅस गळती किंवा आगीसारख्या घटना रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




























































