
ग्राहकांच्या तिकीट बुकिंग आणि कॅन्सलेशनच्या (Cancellation Rules) नियमांवर हिंदुस्थानी रेल्वेने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता प्रवाशांना तिकीट कॅन्सल करताना प्रवासाच्या वेळेनुसार ठराविक शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजेच रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे, ज्याचा थेट परिणाम प्रवाशांना मिळणाऱ्या परताव्यावर (Refund) होणार आहे.
रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, प्रवाशांनी प्रवासाच्या निर्धारित वेळेच्या 72 तास आधी तिकीट रद्द केल्यास त्यांना सर्वाधिक फायदा होईल. अशा परिस्थितीत प्रवाशांना केवळ एक निश्चित किमान रद्द शुल्क (Fixed Cancellation Charge) द्यावे लागेल आणि उर्वरित रक्कम परत मिळेल. मात्र, ही वेळ निघून गेल्यावर परताव्याच्या रकमेत कपात केली जाईल.
एखादा प्रवासी प्रवासाच्या 72 तास ते 24 तास या दरम्यान तिकीट रद्द करत असेल तर, त्याला एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. यासोबतच रेल्वेचे किमान सेवा शुल्कही लागू असेल. म्हणजेच प्रवासाची वेळ जसजशी जवळ येईल, तसतसे तिकीट रद्द करणे प्रवाशांना नुकसान देणारे असेस.
रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रिक्त जागांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे आणि गरजूंना तिकीट मिळावे, या उद्देशाने रेल्वेने ही कठोर पावले उचलल्याचे दिसून येत आहे. या बदलांमुळे आता प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागणार आहे.

























































