
सत्ताधारी महायुतीतील ‘एकात्मता’ दर्शन साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घडले. राज्याची पोलीस यंत्रणा झुंडशाहीचे हस्तक बनून कशी काम करीत आहे हे दिसून आले, मात्र हीच पोलिसी झुंडशाही वापरून ‘मिंधे’ गटाने शिवसेना तेव्हा फोडली होती व सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्याच पोलिसांना गुंड व झुंड म्हणण्याचा अधिकार मिंध्यांच्या मंत्र्यांना नाही. अशी ही साताऱ्याची तऱ्हा आता संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा बनताना दिसत आहे. सर्वच मंत्र्यांनी लाज सोडली आहे. विधिमंडळात लोकशाहीचा खून झाला असे सभागृहात ओरडून काय मिळणार? लोकशाहीचा खून करणारेच सत्तेवर विराजमान आहेत. महाराष्ट्रातील झुंडशाहीचा केंद्रबिंदू त्याच विधिमंडळात आहे. बसा पायऱ्यांवर बोंबलत!
‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ नावाचा मराठी चित्रपट एकेकाळी फार लोकप्रिय झाला होता. तो एक कॉमेडी ड्रामा होता. सातारा जिह्यातील ग्रामीण जीवन, मानवी स्वभाव, रीतिरिवाज, मराठमोळी संस्कृती यांवर आधारित हा चित्रपट होता. लोकजीवनातील साधेपणा, मिश्कीलपणा आणि पारंपरिक रूढी यांचे छान चित्रण या चित्रपटात केले होते. ग. दि. माडगुळकर यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली. ज्या साताऱ्यात ग. दि. माडगुळकरांनी साहित्य, संस्कृती, काव्याचा सुगंध मराठी माणसाच्या जीवनात फुलवला त्या साताऱ्यात एकाच सरकारमध्ये ‘भाऊ भाऊ’ म्हणून मिरवणाऱ्या मंत्र्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, धक्काबुक्की झाली. एक मंत्री शंभुराज देसाई यांना पोलिसांनीच धुतले व त्यात ते जखमी झाले. ही भळभळती जखम घेऊन मंत्री विधिमंडळात पोहोचले. मी मंत्री असूनही दुसऱ्या मंत्र्यांच्या आदेशाने कसा मार खाल्ला, हे सभागृहात साग्रसंगीत सांगितले. हा सर्व प्रकार (मंत्र्यांना मारहाणीचा) लोकशाहीला काळिमा वगैरे फासणारा आहे व राज्यात कायद्याचे राज्य आहे काय? असा प्रश्न स्वतः मंत्री शंभुराज देसाई व त्यांच्या समर्थक आमदारांनी विचारला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले, पण भाजपच्या आमदार व मंत्र्यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. एरवी सत्तेच्या जोरावर गुरगुरणारे गुलाबराव पाटलांसारखे ‘मिंधे’ गटाचे अनेक मंत्री विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निषेधाचे ‘म्यॅव म्यॅव’ करीत बसले. मांजर व बोकासुद्धा प्रतिकारासाठी आपला पंजा मारतो, पण आपल्या गटाच्या एका मंत्र्याने मार खाऊनसुद्धा
या मांजरांनी
फक्त पायऱ्यांवर बसून शेपट्या हलवणेच पसंत केले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे सर्व घडले. शिंदे गट व अजित पवार गटास स्पष्ट बहुमत होते, पण भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे व जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात ‘ऑपरेशन कमळ’ केले. हे ऑपरेशन त्यांनी वाघाची कातडी पांघरून डरकावणाऱ्यांचे मांजर करून यशस्वी केले. भाजपने शिंदे गटाचेच दोन जिल्हा परिषद सदस्य फोडले. क्रॉस व्होटिंग करून घेतले. दोन सदस्यांना मतदानापासून रोखले व पोलिसी दहशतीच्या बळावर जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण केले. मंत्री शंभुराज देसाई (हे सातारचे ढाण्या वाघ बाळासाहेब देसाईंचे नातू) यांना साध्या कपड्यातील पोलिसांनी फरफटत नेले. झटापटीत ते जखमी झाले व रक्त वाहू लागले. ‘‘माझ्या हाताला जखम झाली. रक्त वाहू लागले. लोकशाहीचा खून झाला, खून झाला’’ अशी बोंब मंत्री शंभुराज यांनी ठोकली. शंभुराज यांचे मालक उपमुख्यमंत्री मिंधे यांनीही लोकशाहीचा खून झाल्याचे म्हटले व आदळआपट केली. या आदळआपटीकडे मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पोलीस खात्याने अजिबात ढुंकून पाहिले नाही. अशाप्रकारे साताऱ्यात सत्तेतील मित्रपक्षानेच मित्रपक्षाचा गळा दाबला. या शंभुराज वगैरे लोकांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन बेकायदा पक्षांतरे भाजपच्या मदतीने केली होती. भाजप तेव्हा त्यांच्यासाठी आदर्श पक्ष होता. विधिमंडळात तेव्हाही लोकशाहीचाच खून झाला होता, पण लोकशाही व संविधानाच्या या रक्तपिपासूंना तेव्हा काहीच वाटले नाही. स्वाभिमान आणि हिंदुत्व वगैरेसाठी आपण भाजपबरोबर गेल्याचे ते सांगत राहिले. भाजपने त्या सगळ्यांना आता
गुलाम बनवले
आहे हे साताऱ्यातील घटनेने स्पष्ट केले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सातारा अग्रेसर होता. इथले लोक शिष्टाचार, संस्कार आणि शिस्त यासाठी ओळखले जातात. येथील लोकांत एक रांगडेपणा नक्कीच आहे, पण अलीकडच्या भ्रष्ट राजकारणी व सत्तापिपासू वृत्तीने रांगडेपणाची जागा झुंडगिरीने घेतली. अर्थात जसा राजा तशी प्रजा. त्यामुळे आज मंत्री रस्त्यावर गुंडागर्दी करतात. पोलीस यंत्रणा गुंडगिरीसाठी वापरली जाते. लोकांनी विकासासाठी मतदान करायचे व या लोकांनी भर रस्त्यावर हाणामाऱ्या करायच्या. साताऱ्याच्या रस्त्यावर लोकशाहीचा खून झाला म्हणून कोणी छाती पिटत असतील तर त्यांना याआधी केलेल्या लोकशाहीच्या अशा प्रत्येक खुनाचा हिशेब जनतेला द्यावा लागेल. सत्ताधारी महायुतीतील ‘एकात्मता’ दर्शन साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घडले. राज्याची पोलीस यंत्रणा झुंडशाहीचे हस्तक बनून कशी काम करीत आहे हे दिसून आले, मात्र हीच पोलिसी झुंडशाही वापरून ‘मिंधे’ गटाने शिवसेना तेव्हा फोडली होती व सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्याच पोलिसांना गुंड व झुंड म्हणण्याचा अधिकार मिंध्यांच्या मंत्र्यांना नाही. अशी ही साताऱ्याची तऱ्हा आता संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा बनताना दिसत आहे. सर्वच मंत्र्यांनी लाज सोडली आहे. विधिमंडळात लोकशाहीचा खून झाला असे सभागृहात ओरडून काय मिळणार? लोकशाहीचा खून करणारेच सत्तेवर विराजमान आहेत. महाराष्ट्रातील झुंडशाहीचा केंद्रबिंदू त्याच विधिमंडळात आहे. बसा पायऱ्यांवर बोंबलत!





























































