
हिंदुस्थानी बॅडमिंटन संघाने थॉमस आणि उबर कपसाठी आपला दमदार संघ जाहीर करत जागतिक कोर्टवर पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. ऑल इंग्लंड उपविजेता लक्ष्य सेन पुरुष संघाचे नेतृत्व करणार असून पी. व्ही. सिंधू आणि उगवती स्टार उन्नती हुड्डा महिला संघाची धुरा सांभाळतील. त्यामुळे गतवेळी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या हिंदुस्थानी संघाने यंदा टॉपचेच लक्ष्य ठेवले आहे.
24 एप्रिल ते 3 मेदरम्यान डेन्मार्कमध्ये रंगणाऱया स्पर्धेसाठी 2022 च्या ऐतिहासिक विजेत्या संघाचा गाभा कायम ठेवण्यात आला आहे. किदंबी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, तसेच दुहेरीची जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. युवा आयुष शेट्टीला पहिल्यांदाच संधी मिळाली असून एम. आर. अर्जुन दुखापतीतून सावरत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
महिला संघात सिंधूसोबत गायत्री गोपीचंद-ट्रिझा जॉली ही युगल जोडी आघाडीवर असेल. देविका सिहाग, इशारानी बारुआ, तन्वी शर्मा आणि उन्नती हुड्डा या युवा खेळाडूंच्या जोरावर संघ अधिक बळकट झाला आहे. बॅडमिंटन संघटनेनुसार निवड बीडब्ल्यूएफ रँकिंगच्या आधारे करण्यात आली असून अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संतुलित मिलाफ साधण्यात आला आहे.
पुरुष संघ – लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, किदंबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, किरण जॉर्ज, सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, हरिहरन अम्सकरुणन, एम. आर. अर्जुन, ध्रुव कपिला.
महिला संघ – पी. व्ही. सिंधू, उन्नती हुड्डा, तन्वी शर्मा, देविका सिहाग, इशारानी बारुआ, ट्रीसा जॉली, गायत्री गोपीचंद पुलेला, कविप्रिया सेल्वम, सिमरन सिंघी, तनिषा व्रॅस्टो.






























































