
इराण-अमेरिका युद्धाच्या मुद्दय़ावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींवर पुन्हा निशाणा साधला. ‘नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेले भाषण असंबद्ध होते. मुद्दय़ाला धरून नव्हते. ते हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून बोलत आहेत असे दिसायला पाहिजे होते, पण त्यांनी भूमिकाच घेतली नाही. देशाला याचे परिणाम भोगावे लागतील,’ अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
संसद भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मोदींची पर्सनल फॉरिन पॉलिसी हीच आपल्या देशाची फॉरिन पॉलिसी झाली आहे. जगभरात हा विनोदाचा विषय झाला आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. एखाद्या देशाचे पंतप्रधान जेव्हा शरणागती पत्करतात तेव्हा त्या देशाचे परराष्ट्र धोरण आपोआपच कमकुवत होते. धोरणाशी तडजोड करावी लागते. आपले तेच झाले आहे. नरेंद्र मोदी काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत हे डोनाल्ड ट्रम्प यांना चांगले माहीत आहे,’ असे राहुल म्हणाले.
कोविडमध्ये किती लोक मेले हे ते विसरले!
‘मोदी म्हणतात की कोविडसारखी वेळ येणार आहे. पण कोविडच्या काळात यांच्या सरकारने काय केले हे ते विसरले आहेत. किती लोक मेले होते, काय शोकांतिका झाली होती हेच ते विसरून गेले आहेत. समज नाही,’ असा खोचक टोला राहुल गांधी यांनी हाणला.
‘मोदी सरकारनं स्ट्रक्चरल चूक केलीय. परराष्ट्र धोरणाचा पायाच उखडून टाकलाय. तो दुरुस्त होण्यासाठी खूप वेळ लागेल आणि मोदी ते करू शकत नाहीत.





























































