
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने रविवारी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ आयोजित केली होती. ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत 86 हजार 356 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विविध गटांत 65 विद्यार्थी विजेते ठरले, तर पाचशे विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा निकाल महापौर रितू तावडे यांनी घोषित केला. यंदा पाच गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटातील प्रथम येणाऱया विद्यार्थ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस, पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक पटकावणाऱया विद्यार्थ्यांस प्रत्येकी 20 हजार रुपये, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱया विद्यार्थ्यांस 15 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विभाग स्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे 25 अशी एकूण 25 प्रशासकीय विभागांमध्ये 625 उत्तम चित्रांना प्रत्येकी 500 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
निकाल पुढीलप्रमाणे
गट क्रमांक एक (इयत्ता पहिली व दुसरी) ः प्रथम क्रमांक ‘डी’ विभागातील लेडी इंजिनीअर हायस्कूलमधील दुसरीतील लेविन चलवादी हिने पटकावला.
गट क्रमांक दोन (तिसरी व चौथी) – प्रथम क्रमांक ‘एस’ विभागातील गुरुनानक इंग्लिश प्रायमरी स्कूलमधील चौथीतील रिया विश्वकर्मा हिला मिळाला.
गट क्रमांक 3 (पाचवी ते सहावी) ः प्रथम क्रमांक ‘एच पश्चिम’ विभागातील पाली चिंबई शाळेतील पाचवीतील माही जैसवाल हिने पटकावला.
गट क्रमांक 4 (सातवी ते आठवी) – ‘एल’ विभागातील कुर्ला नौपाडा हिंदी शाळेतील सातवीमधील प्रीती जैसवार अव्वल ठरली.
गट क्रमांक 5 (इयत्ता नववी) – प्रथम क्रमांक ‘ई’ विभागातील पूर्व भायखळा उर्दू शाळेतील सहाना शेख हिने बाजी मारली.



























































