
नवीन शालेय वर्ष जूनमध्ये सुरू होणार असले तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आल्या असतानाच शिक्षण विभाग आज कुंभकर्णी झोपेतून जागा झाला. रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाने आज जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. जिल्ह्यात एकूण ३५ शाळा अनधिकृत असून त्यातील सर्वाधिक २२ शाळा या पनवेल तालुक्यात आहेत.
रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये सर्वत्र पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाने आज ३५ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करत या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन केले आहे. या ३५ शाळांमध्ये श्रीवर्धन तालुक्यात ३, म्हसळ्यात ३, खालापुरात २, अलिबागमध्ये २, कर्जतमध्ये १, उरणमध्ये १, महाड १ आणि पनवेल तालुक्यात तब्बल २२ शाळा अनधिकृत असल्याची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.
कारवाई का होत नाही?
शिक्षण विभाग दरवर्षी बेकायदा शाळांची यादी जाहीर करते. मग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करणाऱ्या या शाळांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल विचारला जात आहे. शिक्षण विभागाने ही यादी उशिरा जाहीर केली. यापूर्वीच अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत मात्र कोणतीही भूमिका शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही.




























































