तंबाखू थुंकण्यासाठी फलाटाच्या कडेला गेला, वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंबाखू थुंकण्यासाठी फलाटाच्या कडेला गेलेल्या एका व्यक्तीचा वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दानापूर विभागांतर्गत येणाऱ्या बारह रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली. पटना-हावडा वंदे भारत एक्सप्रेसची धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

दानापूर आरपीएफचे कमांडंट उदय सिंग पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलाट क्रमांक 2 वर ही घटना घडली. तंबाखू खाल्ल्यानंतर थुंकण्यासाठी संबंधित व्यक्ती फलाटाच्या अगदी कडेला गेली होती, यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस स्थानकावर आली आणि तिची त्या व्यक्तीला धडक बसली. या धडकेत सदर व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असे त्यांनी सांगितले.

बारह येथील आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला बारह सदर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. बारह येथील जीआरपी अधिकाऱ्यांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.