जनतेत घबराट पसरवण्यासाठी पंतप्रधानांना ‘कोविड काळ आवडतो’; गॅस तुटवड्यावरून स्टॅलिन यांची केंद्रावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात निर्माण झालेल्या एलपीजी आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. “जनतेमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांना कोविड काळ आवडतो की काय?” असा खोचक सवाल करत, केंद्र सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच नागरिक रस्त्यावर उतरल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, “सध्या इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकार ज्या प्रकारे विधाने करत आहे, ती कोविड-१९ च्या संकटाच्या काळातील आठवणी ताज्या करत आहेत. जेव्हा सरकार म्हणते की , काहीही तुटवडा नाही, घाबरू नका. तेव्हाच लोकांमध्ये खरी घबराट निर्माण होते. कोविड काळातही सरकारने असाच गोंधळ घातला होता आणि आज पुन्हा एकदा इंधन पंपांवरील रांगा पाहून तोच काळ आठवत आहे.”

देशभरात एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे येत असताना केंद्र सरकार केवळ पीएनजीच्या गप्पा मारत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. “सामान्य गृहिणींना गॅस मिळत नाहीये आणि सरकार मात्र पायाभूत सुविधांच्या जाहिराती करत आहे. जर साठा पुरेसा आहे, तर मग लोकांना रांगेत का उभे राहावे लागत आहे?” असा सवाल स्टॅलिन यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांनी राज्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असले, तरी प्रत्यक्षात केंद्र सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी राज्यांकडे बोट दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. इंधन दरवाढ आणि टंचाईचे खापर आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर फोडून केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचेही ते म्हणाले.