
शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेमार्फत केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान देण्यात आले होते. ही मार्गदर्शक तत्त्वे केवळ सल्ला स्वरूपाची असून ती बंधनकारक नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट करत ही याचिका धुडकावून लावली.
सरन्यायाधीश सुर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. याचिका प्रीमॅच्युअर असल्याचे न्यायालय म्हणाले. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास कोणत्याही दंडात्मक कारवाईची किंवा शिक्षेची तरतूद नाही. केंद्राच्या पत्रात ‘May’ (असू शकते/करावे) हा शब्द वापरला आहे. याचाच अर्थ वंदे मातरम गाणे ऐच्छिक आहे. प्रत्येकाला हे गीत गाण्याचे किंवा न गाण्याचे स्वातंत्र्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. राष्ट्रध्वजाप्रमाणेच हे केवळ राष्ट्रीय गीतासाठीचे प्रोटोकॉल आहेत. कोणावरही सक्ती केलेली नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

























































