रत्नागिरी नगरपरिषदेत गोलमाल है भाई गोलमाल है! अ‍ॅडव्हान्स केलेली काम आता पुन्हा मंजुरीसाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगरपरिषदेने अ‍ॅडव्हान्स केलेली कामे आता अडचणीत सापडली हेत. अ‍ॅडव्हान्स केलेल्या कामांना मंजुरी दिल्यानंतर आपण अडचणीत येऊ नये म्हणून दुसऱ्या सभेत स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा 30 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तीच अ‍ॅडव्हान्स कामे मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर घेतली आहेत. ही गंभीर बाब माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून कलम 308 अन्वये हा विषय तातडीने थांबवावा अशी मागणी निवेदनाद्वारे आज केली आहे. या सर्व प्रकारामुळे नगरपरिषदेत गोलमाल सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिलेल्या निवेदनात या सर्व गैरकारभाराचा पाढा वाचला आहे. 30 जानेवारी रोजी रत्नागिरी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. सभेत विषय क्रमांक 11(5), 12(8), 12(14) आणि 12(16) या विषयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी 31 जानेवारी रोजी राज्य सरकार आणि मुख्याधिकारी यांच्याकडे इमेलवरून तक्रार केली. मंजूर झालेली कामे अ‍ॅडव्हान्स झाली आहेत, त्यांचे जिओ टॅग फोटो आणि व्हिडिओ सोबत जोडले होते. त्यानंतर आपण अडचणीत येऊ या भीतीने 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या कामांना स्थगिती दिली. आता पुन्हा 30 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 64 वर अ‍ॅडव्हान्स झालेली कामे पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हा विषय कलम 308 अन्वये आपण रद्द करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नगराध्यक्षांची भूमिका नक्की काय?

रत्नागिरी शहरातील मतदारांनी शिंदे गटाच्या शिल्पा सुर्वे यांना मोठ्या फरकाने नगराध्यक्षपदी निवडून आणले असताना नगरपरिषदेचा कारभार सुरू होताच अशाप्रकारे अ‍ॅडव्हान्स कामांना मंजुरीनंतर स्थगित आणि पुन्हा मंजुरी दिली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.