
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीमध्ये कोसळली आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला असून यात अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातील दौलतदिया घाट क्रमांक 3 वर भीषण अपघात झाला आहे. सौदार्ह परिवहनची ही बस असून नौकेमध्ये चढत असताना बस नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट पद्मा नदीमध्ये कोसळल्याची माहिती मिळतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी संध्याकाळी वाजून 15 मिनिटांच्या सुमारास घडली. ही बस ढाक्याच्या दिशेने जात होती. बसमध्ये 40 प्रवासी होते. दौलतदिया घाटावर बस फेरीमध्ये चढण्याची प्रतीक्षा करत असताना एका लहान फेरीने धक्क्याला धडक दिली. या धक्क्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीच्या पात्रात कोसळली.
Dhaka, Bangladesh: A passenger bus fell into the Padma River from a ferry at around 5:00 p.m., in front of ferry terminal number 3 in Daulatdia. The bus, carrying about 40 passengers, was travelling from Rajbari to Dhaka, which is 128 kilometers from Dhaka. At that time, the bus…
— ANI (@ANI) March 25, 2026
ही बस नदीत सुमारे 30 फूट खोल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. स्थानिक गोताखोर आणि ढाका येथून आलेले अतिरिक्त पथक बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत. नदीचा वेगवान प्रवाह आणि पाण्याची खोली यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच, घाटावर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने कामात व्यत्यय येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार बसमधील 5 ते 7 प्रवाशांनी पोहून काठ गाठला, तर दोघांना स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र, अद्यापही अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण यांत्रिक बिघाड की चालकाचा निष्काळजीपणा, याचा तपास पोलीस करत आहेत. अधिकृत मृतांचा आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



























































