
शीव, एल्फिन्स्टन पुलांचे काम रखडले आहे. आता परळच्या उड्डाणपुलाचा एक मार्गही बंद करण्यात आला आहे. त्यात भर म्हणून जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य मुंबईत दादर, परळ, लालबाग, प्रभादेवी या भागांमध्ये सध्या प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. कडाक्याच्या उन्हात वाहतूककोंडीत ‘मरा’ असेच हाल सध्या सामान्यांचे झाले आहेत.
एक काम पूर्णत्वास नेण्याआधीच दुसऱया ठिकाणी खोदकाम केले जात आहे. नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या कामांचा फटका नागरिकांना बसला आहे. वाहनांची जागोजागी रखडपट्टी होत असल्यामुळे हजारो वाहनचालक, प्रवाशांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. गिरगाव, भायखळा, महालक्ष्मी, ताडदेव, दादर, वडाळा, शीव अशा वर्दळीच्या भागांसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, बोरिवली, मुलुंड परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेताना ते काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे विविध प्रकल्पांवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या वर्षी ब्रिटीशकालीन एलफिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली होती. सहा महिने उलटले तरी पुलाचे पाडकाम पूर्ण झालेले नाही. हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने परळ, प्रभादेवीसह वरळी, लालबाग, दादर परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी आणि सायंकाळी या परिसरातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. काही किलोमीटरच्या अंतरासाठी मुंबईकर तासन्तास रस्त्यावरच खोळंबत आहेत. एलफिन्स्टन पुलाचे काम अर्धवट असतानाच आता परळ टीटी फ्लायओव्हरवर दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी फ्लायओव्हरवरील वाहतूक अन्यत्र वळवली आहे. पुलाची एक मार्गिका तीन महिने बंद राहणार आहे. एकीकडे एलफिन्स्टन पुलाचे काम रेंगाळले असतानाच हे काम हाती घेण्यात आल्याने दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता वाहतूक तज्ञांकडून वर्तवली जात आहे. शीव पुलाच्या रखडलेल्या कामाचाही वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत आहे.
पावसाळ्यात प्रचंड हाल होणार
पावसाळा दोन महिन्यांवर आला आहे. त्यादृष्टीने आधीच कामांचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र अर्धवट कामे पूर्ण करण्याआधीच नव्या कामांना हात घातला जात आहे. रस्ते काँक्रिटीकरणाचा दिखावा करण्यापेक्षा योग्य नियोजन करून वेळेत कामे पूर्ण करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्ते काँक्रिटीकरण, पुलांची कामे रखडल्यास पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे
उपनगरांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
पूर्व व पश्चिम उपनगरांत वाहतूककोंडीचा प्रश्न भीषण बनला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी खोदकाम केले आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मेट्रो मार्गिकेच्या रेंगाळलेल्या कामाचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. तसेच पश्चिमेकडील एसव्ही रोडवर ठिकठिकाणच्या खोदकामामुळे दर संध्याकाळी वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. पूर्व उपनगरात एलबीएस रोडवर खोदकामाची डोकेदुखी आहे.




























































