
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाठीपुरा परिसराचा समूह पुनर्विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समूह पुनर्विकासाचा निर्णय होऊनही प्रशासकीय कारणामुळे विंलब झाला; पण या आठवडय़ात कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येईल. दोन महिन्यांच्या आत काम सुरू होईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानसभेत केली.
काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी याविषयाकडे लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. कामाठीपुरा परिसराचा समूह पुनर्विकास करण्यासाठी कामाठीपुरा विकास समितीने म्हाडाकडे हा प्रकल्प सोपवला. या भागात 800 घर मालक आहेत आणि 8 हजार भाडेकरू आहेत. 36 एकर जागा आहे. संपूर्ण कामाठीपुरा विभागातील 25 हजार लोकांनी एकमताने निर्णय घेऊन पुनर्विकासासाठी प्रकल्प सरकारकडे सोपवला. 17 फेब्रुवारी 2020 रोजी याचा निर्णय झाला. बैठका झाल्या इमारतींना भेटी दिल्या. त्यानंतर 12 जानेवारी 2023 रोजी म्हाडाला नोडल एजन्सी नेमले. या निर्णयाला तीन वर्षे झाली आहेत. त्यानंतर सल्लागार नियुक्त झाला. प्रकल्पाचे डेंडर झाले. विकासक निश्चित झाला. पुनर्विकासाचा सर्व निर्णय झालेला आहे. पण वर्क ऑर्डर काढलेली नाही. या इमारती धोकादायक झालेल्या आहेत. पुढील काही महिन्यांत पाऊस सुरू होईल. इमारत कोसळून दुर्घटना झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी म्हाडा व सरकारची असेल. कोणत्या अधिकाऱयांनी हा निर्णय रोखून ठेवला आहे, म्हाडा व नगरविकास विभागात ही फाईल का अडकली, काम कधी सुरू होईल, असा सवाल अमिन पटेल यांनी केला.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर
या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. म्हाडाने निविदाही प्रसिद्ध केली होती. विकासकही नेमला आहे. आता काम सुरू होईल. या प्रकल्पाला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यात येईल असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.


























































