मराठेशाहीचा इतिहासकार हरपला; जेष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांचे निधन, कोल्हापूरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले.वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांच्या रूपाने मराठेशाहीचा एक थोर इतिहासकार हरपला. छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, रणरागिणी छत्रपती ताराराणी आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी त्यांचे इतिहास लेखन सदैव सर्वांना मार्गदर्शन करत राहिल,अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.

दरम्यान साने गुरुजी वसाहत येथील त्यांच्या निवासस्थानी पासून अंत्ययात्रा काढुन, दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डाॅ.जयसिंगराव पवार यांच्या पश्चात पत्नी वसुधा कन्या मंजुश्री आणि अरुणा तसेच मुलगा पृथ्वीराज,सुन,नातवंडे असा परिवार आहे.

डाॅ.जयसिंगराव पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती,मालोजीराजे छत्रपती,युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती,मधुरिमाराजे छत्रपती,शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे,जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार,ज्येष्ठ इतिहास संशोधक रमेश जाधव,इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, पुराभिलेख विभागाचे गणेश खोडके यांच्यासह सर्वच स्तरातील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी धाव घेत,आदरांजली वाहिली .सानेगुरुजी वसाहत येथील निवासस्थानातून अंत्ययात्रा काढण्यात आली.ऐतिहासिक दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे काही काळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

*डॉ.जयसिंगराव पवार यांचा परिचय 

डॉ.जयसिंगराव पवार यांचा जन्म दि. 30 डिसेंबर 1941 रोजी तडसर,जि.सांगली येथे झाला.शिवाजी विद्यापीठातून एम.ए.आणि पीएच.डी.पदवी त्यांनी संपादन केली.तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात अध्यापन केले.शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ.अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्या इतिहास संशोधन कारकिर्दीस सुरुवात झाली .विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी छत्रपती ताराबाई,सरसेनापती संताजी घोरपडे,मराठेशाहीचा मागोवा,राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ आदी 25 पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.

* इतिहास परिषदेचे अध्यक्षस्थान 

डॉ.जयसिंगराव पवार यांचे 45 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले.त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवले.अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते.त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली.या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.राजर्षी शाहू स्मारक मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या छत्रपती शाहू महाराज पुरस्कार समितीचे प्रमुख सदस्य होते.

*प्रशासनाचा एक हक्काचा मार्गदर्शक हरपला; -जिल्हाधिकारी अमोल येडगे

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि प्रखर विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ मालवला आहे.राजर्षी शाहू छत्रपती महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या देदिप्यमान इतिहासाला पुराव्यानिशी जगासमोर मांडण्याचे अत्यंत मोलाचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले.डॉ.पवार केवळ एक इतिहासकार नव्हते, तर ते सत्यशोधकी विचारांचे खंदे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक होते.’राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट’ (शाहू स्मारक ट्रस्ट) साठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे.त्यांच्या निधनाने प्रशासनाचा एक हक्काचा मार्गदर्शक हरपला आहे. डॉ.पवार यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे ,जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार,मुख्य कार्य. अधिकारी कार्तिकेयन एस.यांनी पार्थिवावर पुष्प अर्पण केले.

*संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

मराठी इतिहास संशोधनातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि कोल्हापूरच्या मातीतील थोर विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार यांचे निधन संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आहे.छत्रपती शाहू महाराजांचे जीवन व कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे पवार सरांनी आपले लाईफ मिशन मानले होते.छ.शाहूंच्या जीवनावरील त्यांचा ग्रंथ भारतातील आणि विदेशातील अनेक भाषांमध्ये प्रकाशित करून शाहू चरित्र सर्वदूर पोहोचावे म्हणून प्रयत्न केलेले पवार सर हे पहिले आहेत.

*तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध झाला.अशा डॉ जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्वनिष्ठ,व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत,अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पवार यांनी इतिहास संशोधन आणि अभ्यासाला वाहून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा अनेक अंगांनी वेध घेणारी मांडणी त्यांनी केली. विशेषतः शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखन, संशोधन- प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळेच शिवचरित्रासह, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब ते महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू यांच्याविषयी विपुल संदर्भ साहित्याची निर्मिती झाली. डॉ. पवार यांच्या पुढाकारामुळे राजर्षी शाहू छत्रपती यांचे कार्य इंग्रजीसह, अन्य विदेशी तसेच भारतीय भाषांमध्ये पोहोचले. यातून निर्माण झालेली ग्रंथसंपदा ही महाराष्ट्रासाठी संचित ठरणारे आहे. डॉ पवार यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील व्यासंगी मार्गदर्शक हरपला आहे. ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने पवार तसेच त्यांच्या संशोधक विद्यार्थी परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

* ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला; – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ.जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे ऐतिहासिक संशोधन क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

डॉ. जयसिंगराव पवार यांनी केवळ इतिहास लिहिला नाही, तर तो पुराव्यांच्या आधारे जनमानसात रुजवला. कोल्हापूरच्या मातीत राहून त्यांनी शिवकाल आणि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जागतिक पातळीवर नेला. त्यांच्या लेखणीत एक वेगळीच धार आणि सत्याचा आग्रह होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत योगदान देणारा एक दीपस्तंभ गमावल्याचे आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

* मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज, संताजी-धनाजी, राजर्षी शाहू महाराज, रामचंद्र पंत अमात्य ते क्रांतिसिंह नाना पाटील यांसारख्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून डॉ. जयसिंगराव पवार यांनी वस्तुनिष्ठ आणि दस्तऐवजांवर आधारित इतिहास लेखन केले.मराठेशाहीतील इतिहासावरील गैरसमज दूर करून वास्तववादी इतिहास समाजासमोर मांडण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे.

त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील एक प्रामाणिक, अभ्यासू आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.