
इराण-इस्रायल युद्धामुळे एलपीजी आणि इंधनाच्या उपलब्धतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. इंधन टंचाईमुळे देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात महिनाभर पुरेल इतका इंधन साठा असून लॉकडाऊन लागण्याची परिस्थिती नसल्याचे स्पष्ट करत अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
भारताने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा होऊ दिला नाही. घरगुती गॅसची कोणतीही कमतरता होऊ दिली नसल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले.
– शेजारील देशांतील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्र सरकारने इंधनाची उत्तम व्यवस्था केली असून नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
– इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार असल्याची खोटी माहिती समाजमाध्यमावर टाकली किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल.
पेट्रोल पंपांवर रांगा लावण्याची गरज नाही
आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता होती. सामान्य ग्राहकांना याचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर 10 रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आता अधिकच्या दरात पेट्रोल-डिझेल घ्यावे लागणार नाही. तसेच पेट्रोल पंपांवर रांगा लावण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभारही त्यांनी व्यक्त केले.
तो व्हिडीओ खरा असेल तर कारवाई करू
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर संपर्क साधून व्हायरल व्हिडीओबाबत सांगितले. तीन-चार व्हिडीओ एकत्र करून तो तयार करण्यात आला असून याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना त्या व्हिडीओबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितली आहे. त्या व्हिडीओची शहानिशा करून या संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासली जाईल. तो व्हिडीओ खरा असेल तर झिरवाळ यांच्यावर कारवाई केली जाईल. यासंदर्भात त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य तो निर्णय घेऊ, असे फडणवीस म्हणाले.



































































