
राज्यावर इंधन आणि गॅस पुरवठ्याचं संकट गडद होत असताना, सरकारने आधी विरोधी पक्षनेत्याची निवड करायला हवी, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले. यासंदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले, सध्याच्या घडीला सरकारने राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र घेऊन व्यवस्था मार्गी लावायला हवी.
खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचं नाव आलं ते अत्यंत गंभीर आहे असंही यावेळी संजय राऊत यांनी मत व्यक्त केले. तसेच हे प्रकरण राज्याला कलंकित करणारे असून, त्यामध्ये राज्यासह देशातील अनेक महत्वाचे नेते आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदार स्वत: दीपक केसरकर म्हणतात, मीच का? 40 आमदार तिथे जात होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार असं सांगत आहेत की, मलाच टार्गेट करू नका. तिथे 40 आमदार, खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते का? असा प्रश्न राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. हे 40 आमदार नेमके कोण आहेत याचा फडणवीसांनी आधी जाहीर करायला हवे. तसेच याबरोबरीने खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोकं होते? हे सुद्धा त्यांनी उघड करायला हवे. खरात दिल्लीला जाऊन कुणाला भेटत होते हे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्यास हे सत्य आता समोर यायला हवे अशी मागणी यावेळी राऊत यांनी केली.
खरात या विषयावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, खरातचा वावर कुठे नव्हता? सर्वत्र होता, बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा, असा त्याचा वावर होता, जणू काही सरकारने त्याला राजमान्यताच दिली होती असा सणसणीत टोला यावेळी राऊतांनी लगावला. ही राजमान्यता देणारे लोकं आजही फडणवीसांच्या मंत्रीमंडळामध्ये आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावं असंही यावेळी राऊत म्हणाले.
नरहरी झिरवळांच्या व्हिडीओ संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारताच राऊत म्हणाले, त्या व्हिडीओची सत्यता कशी पडताळणार? किरीट सोमय्यांचा असा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्या व्हिडीओची सत्यता देखील तपासणार होते. मग अशा प्रकारचे व्हिडीओ आले की, त्यांची सत्यता कधीच पडताळली जात नाही. एक ठराविक असं उत्तर दिलं जातं. विरोधी पक्षाच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या असत्या तर, आधी फाशी मग चौकशी, असं झालं असतं. इथे फाशीचं नावंच नाही, करू चौकशी, करू चौकशी फक्त एवढंच म्हटलं जातं असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला.


























































