सावकारी आणि हवाला रॅकेट खरातची ईडी चौकशी होणार, फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढून भीती घालून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱया अशोक खरातचे दररोज नवीन प्रताप चव्हाटय़ावर येत आहेत. महिलेवर अत्याचार केला, बनावट रत्ने व अंगठ्या देऊन आर्थिक फसवणूक केली, असे आणखी दोन गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, हवाला रॅकेट व व्याजाच्या धंद्यात त्याने शेकडो कोटींची उलाढाल केल्याचे विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे. त्याच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होणार आहे, यामुळे त्याच्याशी संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

नाशिकमधील पती-पत्नीत सातत्याने वाद होत असल्याने ते सन 2022 मध्ये खरातकडे गेले. तुमचा विवाह चुकीच्या तारखेला झाला आहे, असे त्याने सांगितले. यानंतर ते पुन्हा 2024 ला त्याच्याकडे गेले, तेव्हा त्याने पतीला केबिनबाहेर बसविले, महिलेला तांब्याच्या भांडय़ात पाणी प्यायला देऊन तिच्यावर बलात्कार केला. ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या काळात त्याने या महिलेवर चार वेळा अत्याचार केला, या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशिरा खरातविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यात दैवी शक्ती आहे, मी महादेवाचा अवतार आहे, कुणाला सांगितले तर पतीला, मुलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली होती, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

व्यवसाय तेजीत यावा यासाठी कापड विक्रेत्या पती-पत्नीला खरातने रत्नजडीत अंगठय़ा देऊन लाखो रुपये उकळले होते. त्याचा भोंदूपणा उघड झाल्यानंतर या दाम्पत्याने अंगठय़ा व रत्नांच्या सत्यतेची पडताळणी केली असता ते सर्व बनावट आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत लैंगिक अत्याचाराचे आठ व आर्थिक फसवणुकीचे दोन गुन्हे खरातविरुद्ध दाखल आहेत.

आर्थिक व्यवहाराचे आंतरराष्ट्रीय रॅकेट

लैंगिक शोषणाच्या विकृतीचा कळस करणाऱ्या अशोक खरातचे आर्थिक फसवणुकीचे उलाढालीचे मोठे रॅकेट आहे, त्याच्या संपर्कातील विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांचा काळा पैसा तो व्याजाने देत होता. हवालामार्फत देश-विदेशात तो शेकडो कोटींची हेराफेरी करीत होता, अशी माहिती तपासी पथकाकडे आली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाणार आहे, त्याच्याशी संबंधित सर्वांभोवती लवकरच ईडीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे, यामुळे त्यांची पळापळ सुरू आहे.

भोंदूगिरीला कायमस्वरूपी चाप बसवा – अंनिस

भोंदू अशोक खरात, गणेश जगताप ऊर्फ बडे बाबा यासह अनेकांनी अंधश्रद्धेने लोकांची फसवणूक केली आहे. अशा भोंदूंच्या शोधाची व त्यांच्यावर धडक कारवाईची मोहीम सरकारने हाती घ्यावी, लपूनछपून सुरू असलेल्या भोंदूगिरीला आळा घालावा, त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. नाशिक जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या निवेदनावर अंनिसचे प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्र्ााr, विजय बागुल, विजय खंडेराव आदींच्या सह्या आहेत.