वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीवर चाकू हल्ला, निमगाव पागा जत्रेत तुंबळ हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जत्रेच्या आनंदमय वातावरणात क्षणात रक्तरंजित नाटय़ घडल्याने संगमनेर तालुका हादरला आहे. गावातील किरकोळ वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावलेल्या व्यक्तीवरच जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना निमगाव पागा येथे उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

जत्रेदरम्यान बाप-लेकामध्ये सुरू असलेला वाद शांत करण्यासाठी नितीन रावसाहेब कानवडे (वय 46) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘तुझा काय संबंध’, असा सवाल करत एकाने चाकू काढत कानवडे यांच्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्याने जत्रेतील वातावरण चिघळले. काही क्षणातच गोंधळ उडत तुंबळ हाणामारी झाली आणि जत्रा अक्षरशः रणांगणात परिवर्तित झाली.

हल्ल्यात गंभीर जखमी नितीन कानवडे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी कारवाई करत जखमीचा जबाब नोंदविला आहे. आरोपी रवींद्र भाऊसाहेब बागडे (वय 32) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपी बागडे हाही जखमी झाला आहे.

पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विकास काळे तपास करीत आहेत.