
मुंबई महानगरपालिकेला पहिल्या महिला आयुक्त मिळाल्या आहेत. मुंबईच्या नव्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची निवड झाली असून मंगळवारी या संदर्भात शासन आदेश काढण्यात आला. आज सायंकाळी साडे चार वाजता त्या पदभार स्वीकारणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या रिक्त जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. या नवीन नियुक्तीसोबतच अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्या मेट्रो प्रकल्पांची धुरा सांभाळतील.
दरम्यान, अश्विनी भिडे यांच्याकडील मुख्यमंत्री कार्यालयातील सध्याच्या पदाचा आणि खनिकर्म विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांच्याकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासकीय बदल्यांच्या या प्रक्रियेत नवनियुक्त आयुक्तांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आजच अश्विनी भिडे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील.
































































