
कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पतीचा मृतदेह पाहताच धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीनेही इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.
भानू चंदेर रेड्डी (३७)असे पतीचे तर शाझिया (३४) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्या आधी ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ते दोघेही मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. बंगळुरूतील कोथानूर येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात ते राहत होते. मात्र या दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद व्हायचे.
या वादातूनच भानू रेड्डीने गळफास लावून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भानूचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. जेव्हा शाझियाने तिच्या पतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला, तेव्हा तिला मोठा मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून तिने टोकाचे पाऊल उचलत इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून खाली उडी मारली, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्या नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





























































