
कोरोना संपला असे वाटत असताना त्याच्या एका नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून जगभरात ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरिएंट बीए.3.2 वेगाने पसरत आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटची ओळख झाल्यानंतर आता तो अमेरिका- युरोपसह जगभरातील 23 देशांमध्ये पसरला आहे. तज्ञांनी नव्या व्हेरिएंटला ‘सिकाडा’ असे नाव दिले आहे.
व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे का?
तज्ञांच्या मते, सध्या तरी असा कोणताही पुरावा नाही की, हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे. मात्र, त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. म्हणजेच जास्त लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण, वयोवृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक यांना धोका होऊ शकतो.
कुठून आला?
तज्ञांच्या मते, हा व्हेरिएंट सर्वप्रथम नोव्हेंबर 2024 मध्ये आफ्रिकेत आढळला. त्यानंतर 2025 मध्ये तो हळूहळू इतर देशांमध्ये पसरत गेला. फेब्रुवारी 2026 पर्यंत हा व्हेरिएंट तब्बल 23 देशांमध्ये पोहोचला आहे. अमेरिकेत या व्हेरिएंटचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. 29 राज्यांमध्ये सांडपाणी तपासणीत या व्हायरसचे अंश आढळले आहेत. याचा अर्थ हा व्हायरस ‘अंडर द रडार’ पद्धतीने शांतपणे पसरत आहे.
हिंदुस्थानात काय स्थिती…
हिंदुस्थानात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. एक्सएफजी नावाच्या आणखी एका व्हेरिएंटचे 163 रुग्ण आढळले आहेत. हादेखील ओमिक्रॉनचाच एक प्रकार आहे. तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे बीए.3.2 हिंदुस्थानात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्लक्षही करू नका.
‘सिकाडा’ व्हेरिएंट नेमका काय आहे?
हा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा वंशज आहे. 2021 मध्ये ओमिक्रॉनने जगभरात मोठा धुमाकूळ घातला होता. आता त्याचाच हा बदललेला प्रकार समोर आला आहे. या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 70 ते 75 जेनेटिक बदल आढळले आहेत. स्पाइक प्रोटीन म्हणजे असा भाग, जो आपल्या शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करायला मदत करतो. त्यामुळे हा व्हायरस अधिक वेगाने पसरतो.


























































