
वंशपरंपरागत म्हणजेच जेनेटिक डिसॉर्डर बाबत नागरिकांमधील अज्ञान दूर करणे व जागरूकतेसाठी कामा रुग्णालयात उद्या 1 एप्रिलपासून ‘जनुकीय समुपदेशन विभाग’ सुरू करण्यात येत आहे. या विभागामार्फत रुग्णांना अत्याधुनिक व तज्ञ उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून जनुकीय आजारांचे निदान, समुपदेशन आणि व्यवस्थापनावर विशेष भर दिला जाणार आहे.
प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कामा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वंशपरंपरागत आजाराबाबत माहितीच नसते. तसेच नवजात बालकांमध्येदेखील अशा प्रकारचे आजार आढळून येतात. त्यामुळे नागरिक आणि रुग्णांच्या मनातील जनुकीय आजाराबाबत असलेली भीती व अज्ञान दूर करण्यासाठी हा विभाग सुरू करण्यात येणार आहे. विभागाची जबाबदारी डॉ. शबाना बोराटे आणि डॉ. क्षमता किंद्रे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.


























































