
देशामध्ये नक्षलवाद सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. नक्षलवाद संपविण्याची 31 मार्चची मुदत संपण्यापूर्वीच महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात 43 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. नक्षलवादाचे अस्तित्त्व आता केवळ दोन नेत्यांपुरते शिल्लक राहिले असून ते नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय आहे.
छत्तीसगडच्या 9 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. याशिवाय छत्तीसगडच्या बिजापूर जिह्यात दंडकारण्य स्पेशल झोनल समितीच्या 25 जहाल नक्षलवादी शरण आले. त्यांच्याकडून एके-47 रायफल्स, 2.90 कोटींची रोख रक्कम तसेच 11.16 कोटी रुपये किमतीचे 7.20 किलो सोने ताब्यात घेण्यात आले. या नक्षलवाद्यांमध्ये मंगल कोरसा उर्फ मोटू, आकाश उर्फ फागू उईके, विभागीय समितीचा सदस्य शंकर मुचकी, पाले कुरसाम यांचा समावेश आहे. याशिवाय दंतेवाडा जिह्यात 5 तसेच सुकमा आणि कांकेर जिह्यात 4 नक्षलवादी शरण आले. नारायणपूरमध्ये एका नक्षलवाद्याने शस्त्र टेकवली.
1.5 कोटींचे बक्षीस असलेला सुरेश आला शरण
कुख्यात नक्षलवादी नेता सी. नारयण राव ऊर्फ सुरेश याने आंध्र प्रदेशमध्ये 8 साथीदारांसह आत्मसमर्पण केले. त्याच्यावर 1.5 कोटींचे बक्षीस होते. विशाखापट्टणम येथील आमदार किदारी सर्वेश्वर राव यांच्या हत्येचा तो प्रमुख सूत्रधार होता.
लाल गड ढासळला
170 जिह्यांमध्ये पसरलेली चळवळ संपण्यात जमा आहे. 3.5 कोटींचे बक्षीस असलेला मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणवती हा नेपाळमध्ये गेल्याचा संशय आहे. याशिवाय झारखडचा मिशिर बेसरा हा बिहार आणि ओडिशा राज्यांच्या सीमेवर सक्रिय आहे. हा एकमेव मोठा नक्षल नेता सध्या सक्रिय आहे.



























































